शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे लुटला दिवाळी फराळाचा आनंद
प्रतिनिधी (सत्यवान गांवकर): जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा दारिस्ते नंबर १ या शाळेला १७ डिसेंबर 2023 रोजी शंभर वर्षे पूर्ण होणार असून शतक महोत्सवानिमित्ताने शाळेत वर्षभर विविध सहशालेय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. दिवाळी सणाच्या निमित्ताने शाळेत शालेय विद्यार्थ्यांनी बनविलेल्या भेटकार्ड, पतंग व आकाश कंदीलांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. गुरुवार दिनांक ९ नोव्हेंबर रोजी शाळेला दिवाळी सुट्टी सुरू होण्यापूर्वीचा शेवटचा दिवस शाळेच्या शिक्षिका शांती बोभाटे यांच्या संकल्पनेतून दिवाळी सण साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील मुला मुलींनी विविध प्रकारच्या रांगोळ्या व दिवाळी फराळाची आकर्षक मांडणी केली शाळेचे शतक महोत्सवी वर्ष असल्याने शंभर पणत्यांनी परिसर उजळून निघाला होता. शालेय विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात खूप मज्जा केले कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थी शिक्षक व पालक वर्गाने एकत्र बसून दिवाळी फराळाचा आनंद घेतला या कार्यक्रमाकरिता शाळेतील शिक्षक शांती बोभाटे, शालिनी हरकुलकर ,प्रशांत बोभाटे, संजय तांबे यांनी मेहनत घेतली. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय गावकर, सरपंच सानिका गावकर, उपसरपंच संजय सावंत यांनी मुलांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.