ऑनलाईन अर्ज छाननीसाठी पावती आवश्यक
कणकवली (प्रतिनिधी) : गिरणी कामगारांनी घरांसाठीे म्हाडामध्ये बॅकांच्या माध्यमांतून भरलेल्या अर्जांच्या पोच पावत्या अद्यापही आमच्याकडे पडून राहिल्या आहेत. सद्या म्हाडाने ऑनलाईन अर्ज छाननी मोहिम सुरू केली आहे. पुराव्यांची कागदपत्रे अर्जांमध्ये दाखल करताना या पोच पावत्या असणे आवश्यक आहे. तरी जिल्यातील गिरणी कामगारांकडे या पोच पावत्या नसतील तर त्यांनी आमच्याकडून न्याव्यात, अशी सूचना गिरणी कामगार कर्मचारी निवारा आणि कल्याणकारी संघाचे कोकण विभागीय संघटक गणपत तथा भाई चव्हाण आणि सिंधुदुर्ग जिल्हा गिरणी कामगार संघटनेचे अध्यक्ष शाम कुंभार यांनी केले आहे.
सन २०११ आणि २०१२ मध्ये गिरणी कामगारांनी ॲक्सिस आणि सारस्वत बॅंकांच्या माध्यमातून म्हाडाकडे भरले होते. त्या अर्जांपैकी २२ पोच पावत्या श्री चव्हाण यांच्याकडे तर २०० च्या आसपास श्री कुंभार यांच्या दप्तरी अजुनही पडून आहेत. विशेष म्हणजे ही छाननी मोहिम सुरू झाल्यानंतर दिवंगत कामगार नेते दिनकर म्हसकर यांच्या कुटुंबीयांनी अशा पावत्या गिरणी कामगारांची होणारी अडचण लक्षात घेऊन कुंभार यांच्याकडे सुपूर्द केल्या आहेत. तरी पोच पावत्या न्यायाला विसरलेल्यांनी चव्हाण (९४२२३८१९९३), कुंभार (९४०३५६०११९) आणि दै. रत्नागिरी टाइम्सच्या सावंतवाडी कार्यालयातून ओळखीच्या पुराव्यानिशी घेऊन जाव्यात, अशी सूचना केली आहे.