सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकासच पर्यटनावर आधारित आहे. पर्यटन आणि केंद्राच्या लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योग विभागाच्यावतीने येथील विकास साधला जाणार आहे. मात्र, ४ डिसेंबर रोजी पंतप्रधान जिल्ह्यात नौदल दिनानिमित्त येत आहेत. त्याचा अर्थ त्यांनी काहीतरी दिले पाहिजे, असे नाही. देशाचे पंतप्रधान आपल्या जिल्ह्यात येत आहेत, हे खूप मोठे आहे. त्यानंतर आम्ही त्यांना आमच्या जिल्ह्यात आलेल्याची आठवण करून देवून विकासात्मक प्रकल्प जिल्ह्यात आणण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी आज पडवे येथील एस एस पी एम मेडिकल कॉलेज येथे आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री राणे बोलत होते. यावेळी पुढे बोलताना मंत्री राणे यांनी, नौदल दिन कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंधुदुर्ग किल्ल्यावर येत आहेत. त्याची पूर्व तयारी भाजपकडून सुरू आहे. हा कार्यक्रम राज्य सरकार आणि नौदल विभाग यांच्यावतीने नियोजित केला जात आहे. राज्याच्या अधिकारी मनीष म्हसकर यांच्याकडे नियोजन असून अंतिम रूपरेषा प्रशासन जाहीर करणार आहेत. तारकर्ली येथील कार्यक्रमात पंतप्रधान मोदी भाषण करणार आहेत, असे यावेळी राणे म्हणाले.
ट्रेनिंग सेंटरसाठी १६ कोटींची जमीन वर्ग
केंद्र सरकारच्या लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योग विभागाच्यावतीने सिंधुदुर्गनगरी येथे ट्रेनिंग सेंटर सुरू केले जात आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने १६ कोटी रुपयांची जमीन या विभागाकडे वर्ग केली आहे. लवकरच याचे भूमिपूजन केले जाणार आहे. पी एम विश्वकर्मा योजनेसाठी जिल्ह्यात लाभार्थी संख्या वाढली तर जिल्ह्यात प्रशिक्षण सुरू केली जातील, असेही यावेळी राणे यांनी सांगितले.
केसरकर यांनी घेतली राणे यांची भेट
गेली अनेक वर्षे राजकीय वैर असलेल्या व भाजप बरोबर सत्तेत गेल्यानंतर थोडी मवाळ भूमिका घेतलेल्या शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज केंद्रीयमंत्री नारायण राणे यांची भेट घेतली. याबाबत विचारले असता राणे यांनी आपण केसरकर यांना बोलाविले होते. जिल्ह्यातील डी एड बेरोजगारांचे प्रश्न होते. रत्नागिरी जिल्ह्या प्रमाणे सिंधुदुर्गातील डी एड बेरोजगारांना तात्पुरते सेवेत घेण्यास आपण त्यांना सांगितले आहे. ते केसरकर यांनी मान्य केले आहे. तसेच संभाव्य शिक्षक भरतीत डी एड बेरोजगारांचा समावेश करावा, अशी मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असल्याचेही यावेळी राणे म्हणाले. यावेळी राणे यांनी आपली व केसरकर यांची कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. केसरकर यांच्याशी राजकीय चर्चा करण्याचा सबंधच येत नसल्याचे सांगितले.