जिल्हा प्रधान व सत्र न्यायाधीश श्री.भारुका उद्या 8 डिसेंबर रोजी सुनावणार शिक्षा
अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांचा यशस्वी युक्तिवाद
ओरोस (प्रतिनिधी) : जमिन विक्रीच्या पैशाच्या वादातून ओटवणे येथील आपला काका प्रभाकर नाईक याचा फावड्याने जीवघेणा प्रहार करून खून केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी शैलेश वसंत नाईक याच्याविरोधात सदोषमनुष्यवधाचा गुन्हा सिद्ध झाला असून जिल्हा प्रधान व सत्र न्यायाधीश श्री.संजय भारुका उद्या 8 डिसेंबर रोजी शिक्षा सुनावणार आहेत. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता श्री गजानन तोडकरी यांनी केलेला यशस्वी युक्तिवाद आरोपी शैलेश नाईक याचा गुन्हा शाबीत करणारा ठरला आहे. 17 ऑक्टोबर 2021 रोजी हा गुन्हा घडला होता.याबाबत मयत प्रभाकर नाईक याचा भाऊ संतोष लक्ष्मण नाईक याने फिर्याद दिली होती.त्यानुसार सावंतवाडी पोलीस ठाण्यात आयपीसी 302 व अन्य कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा यशस्वी तपास सावंतवाडी पोलिस ठाण्याचे तत्कालीन एपीआय तौफिक सय्यद यांनी केला होता. या गुन्ह्याची सुनावणी जिल्हा प्रधान तथा सत्र न्यायाधीश श्री संजय भारुका यांच्या न्यायालयात झाली. सुनावणीअंती अतिरिक्त सरकारी अभियोक्ता श्री गजानन तोडकरी यांनी केलेल्या यशस्वी युक्तिवादामुळे आरोपी शैलेश नाईक याच्या विरोधात आयपीसी 304 (1 ) नुसार गुन्हा सिद्ध झाला असून 8 डिसेंबर रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे.












