कै.राजाराम मराठे कृषि महाविद्यालयात आंतर महाविद्यालयीन संशोधन महोत्सव -अविष्कार संपन्न

फोंडाघाट (प्रतिनिधी) : डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठा अंतर्गत कै.राजाराम मराठे कृषि महाविद्यालय,फोंडाघाट, येथे ‘अविष्कार २०२३- आंतर महाविद्यालयीन संशोधन महोत्सव’ आयोजित करण्यात आला, कृषि क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या संशोधक वृत्तीला चालना मिळावी व ह्या संशोधनाचा उपयोग कृषि संबंधित सर्व घटकांना व्हावा ह्या उद्देशाने दरवर्षी विद्यापीठ अंतर्गत ह्या संशोधन महोस्तवाचे आयोजन केले जाते.

सदर आयोजित कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. पी.ई. शिनगारे,तसेच विशेष अतिथी म्हणून,क्रीडा व सहशैक्षणिक उपक्रम संचालक डॉ.व्ही.जी.नाईक,विद्यापीठ अविष्कार समन्वयक डॉ. मनिष कस्तूरे,वाकवली संशोधन केंद्राचे उपसंचालक डॉ.ए.व्ही.माने उपस्थित होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ब्राम्हणेश्वर शैक्षणिक सामाजिक उन्नती मंडळ फोंडाघाट संस्थेचे अध्यक्ष दिपेश मराठे ह्यांनी भूषवले, कार्यक्रमासाठी ब्राम्हणेश्वर शैक्षणिक सामाजिक उन्नती मंडळ फोंडाघाट संस्थेच्या कायदेशीर सल्लागार मिताली मराठे, संचालिका विद्या राणे-पाटील, संचालक जनार्दन देसाई, कै.राजाराम मराठे कृषि महाविद्यालय, फोंडाघाटचे प्राचार्य पंकज संते, महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग, इतर कर्मचारी वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. रुपाली ढोले व प्रा. स्वाती दळवी ह्यांनी केले.

कृषि विकासासाठी शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञान व संशोधन अत्यंत महत्वाचे आहे, तंत्रज्ञान, स्मार्ट शेती, व कृषि क्षेत्रातील इतर संशोधनांमुळे, साधनांचा शाश्वत वापर करून अन्न सुरक्षा,उत्पादकता असे अनेक प्रश्न सोडवले जाऊ शकतात तसेच कृषि क्षेत्रातील उद्योगांना चालना मिळू शकते असे मत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ.पी.ई.शिनगारे ह्यांनी बोलताना व्यक्त केले.

ह्या कार्यक्रमात डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी कृषि आणि पशुसंवर्धन, कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान,वाणिज्य,व्यवस्थापन,आणि कायदा,औषध शास्त्र, मानविकी अनुसंधान,विज्ञान अशा वेगवेगळ्या विषयांवर प्रकल्प प्रदर्शित केले.

error: Content is protected !!