फोंडाघाट (प्रतिनिधी) : डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ दापोली अंतर्गत कै.राजाराम मराठे कृषि महाविद्यालय,फोंडाघाट,आयोजित ‘आंतर महाविद्यालयीन संशोधन महोत्सव- अविष्कार २०२३’ ह्या स्पर्धेत कै. राजाराम मराठे कृषि महाविद्यालय, फोंडाघाट चे कु.प्रतिक कुंभार,कु.सुयश प्रभूखानोलकर व कु.समीक्षा मांडवकर ह्या कृषि पदवितील विद्यार्थ्यांनी कृषि अभियांत्रिकी विषयांतर्गत शेतकरी मित्र बहुउद्देशीय यंत्र तयार करून प्रथम क्रमाक मिळवला.
५ इन- १ टूल विवरण असेलेले हे यंत्र एकट्या शेतकऱ्याला अगदी सहजपणे हाताळण्या जोगे आहे. ह्या यंत्रामध्ये वापरण्यात आलेली पाच वेगवेगळे हत्यारे शेतीच्या दररोज उपयोगी पडणारी आहेत. ह्यामध्ये ‘बिग डिगर’ हत्यार त्याने जमीन खोदण्यास व गवताची काढणी करण्यास उपयोगी पडते, दुसरे हत्यार म्हणजेच ‘हँड प्लाऊ’ ज्याच्या मदतीने हलकी माती असलेली जमीन नांगरण्यास मदत होते. तिसरे हत्यार ‘हँड कल्चरेटर’ ज्याचा उपयोग रांगेत पेरणी करण्यासाठी होतो. चौथे हत्यार ‘प्रतिक सिक्कल’ च्या सहाय्याने झाडांची कापणी व आकार दिला जाऊ शकतो आणि पाचवे हत्यार ‘हँड सीडर’ ज्याने समान अंतरावर पेरणी करणे शक्य होते. अशा ह्या बहुउद्देशीय यंत्र बनवण्यासाठी मात्र रु.२,५०० खर्च आहे. हे यंत्र शेतीसाठी एक सोपे,सहज आणि किफायतीशीर आहे.
या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य पंकज संते,प्राध्यापिका स्वाती पाटणकर व प्राध्यापिका अक्षता मुरुडकर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. ब्राम्हणेश्वर शैक्षणिक सामाजिक उन्नती मंडळ फोंडाघाट चेअध्यक्ष दिपेश मराठे साहेब तसेच संस्था पदाधिकारी यांनी विजेत्या स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.