देवगड दुर्घटनेबाबत आचरा समुद्र किनारी पर्यटकांमध्ये जागृती
आचरा (प्रतिनिधी): स्वतःचा जीव मौल्यवान आहे. पर्यटनाच्या उत्साहात पाण्यात उतरण्याच्या मोहापाई तो व्यर्थ धोक्यात घालून गमावू नका असे आवाहन आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर यांनी केले. शनिवारी देवगड बीच येथे झालेल्या दुर्घटनेत पुणे येथील खाजगी अकादमीच्या प्रशिक्षणार्थींच्या पाच विद्यार्थ्यांचा समुद्री स्नानाच्या मोहापाई दुर्दैवी मृत्यू झाला होता. यामुळे बहरणार्या सिंधुदुर्गातील ऐन पर्यटन हंगामाच्या सुरुवातीलाच पर्यटन हंगामाला दुःखाची किनार लाभली होती.या बाबत आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर यांनी सोमवारी सायंकाळी आचरा समुद्र किनारी भेट देवून समुद्र किनारी उपस्थित पर्यटकांना सुरक्षेबाबत सुचना केल्या. यावेळी त्यांच्या सोबत ग्रामपंचायत सदस्य मुझफ्फर मुजावर, पोलीस कर्मचारी तांबे,पोलीस पाटील जगन्नाथ जोशी,सागर जीवरक्षक अक्षय वाडेकर, आदी उपस्थित होते. 5 जण बुडून झालेल्या दुखःद दुर्घटनेची माहिती देऊन पर्यटना वेळी समुद्रकिनारी घ्यावयाचा काळजीबाबत सूचना तसेच मार्गदर्शन केले.