शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ‘शाळेत चला अभियान’ राबविणार – दीपक केसरकर

नागपूर (प्रतिनिधी) : राज्यात ३ ते १८ वर्षे वयोगटातील शाळाबाह्य अनियमित व स्थलांतरीत बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्यात ‘शाळेत चला अभियान’ राबविण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज विधानसभेत दिली. मंत्री केसरकर म्हणाले की, १७ ऑगस्ट, २०२३ ते ३१ ऑगस्ट, २०२३ या कालावधीमध्ये राज्यात सर्वत्र सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात राज्यात १६२४ मुले व १५९० मुली असे एकूण ३२१४ बालके शाळाबाह्य आढळून आली आहेत. या सर्वेक्षणानुसार संपूर्ण मुंबईत एकूण ३५६ बालके शाळाबाह्य आढळून आले असून ही सर्व ३५६ बालके शाळेत दाखल करण्यात आली आहेत. ठाणे जिल्ह्यात ३८० बालके शाळाबाहय आढळून आले असून त्यापैकी २९७ बालके शाळेत दाखल करण्यात आली आहेत, रायगडमध्ये ३८ बालके शाळाबाहय आढळून आले असून ती सर्व बालके शाळेत दाखल करण्यात आली आहेत. तर पालघर मध्ये ९२८ बालके शाळाबाहय आढळून आले. सर्वेक्षणाच्या कालावधी मध्ये ७१ बालके व सर्वेक्षणाच्या कालावधी नंतर ९४ अशी एकूण १६५ बालके शाळेत दाखल करण्यात आली आहेत. उर्वरीत ७६३ बालकांना देखील नजीकच्या शाळेत दाखल करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!