कोकणातील बस स्थानकांतील धुळीच्या साम्राज्यामुळे प्रवाशांना आरोग्याच्या समस्या

आमदारांनी निधी देऊन प्रवाशांना आरोग्यदायी दिलासा द्यावा – भाई चव्हाण

कणकवली (प्रतिनिधी) : कोरोना नंतरच्या एसटी कर्मचार्यांच्या संपामुळे राज्य परिवहन महामंडळ आर्थिकदृष्ट्या संकटात सापडले आहे. त्यामुळे प्रवाशीभीमुख विकास कामांना कात्री लागली आहे. परिणामी कोकणातील बहुसंख्य स्थानकांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. स्थानकांच्या आवारातील डांबरीकरण अथवा फ्लेवर्स उखडून गेले आहेत. सबब स्थानकांतील आवारात धुळीचे साम्राज्य निर्माण होत आहे. त्याचा प्रवाशांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. या पार्श्वभुमीवर आता कोकणातील बस स्थानकांत धुरळा हटाव मोहिम राबविण्यासाठी आमदारांनी स्वत:च्या आमदार निधीतून स्थानकांची दुरुस्ती, सुशोभीकरण आदी विकास कामांसाठी भरघोस आर्थिक निधी द्यावा, असे आवाहन कोकण विकास आघाडीचे मुख्य संघटक, ज्येष्ठ पत्रकार गणपत तथा भाई चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

रा. प. महामंडळाच्या मुंबई सेंट्रल येथील मध्यवर्ती कार्यालय आणि तेथे असलेल्या स्थानकाचे “हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बस स्थानक” या मोहिमेंतर्गत स्थानिक मुंबईतील आमदार यामिनी जाधव यांनी जिल्हा विकास मंडळाच्या माध्यमातून तब्बल रुपये दीड कोटीचा निधी दिला आहे. त्यामुळे या मध्यवर्ती बस स्थानकाच्या दुरुस्ती, सुशोभीकरणाच्या कामांचा नुकताच शुभारंभ झाला आहे, अशी माहिती देऊन चव्हाण म्हणतात, मुख्यमंत्री तथा परिवहन मंत्री एकनाथजी शिंदे यांनी रा. प. महामंडळाला पुर्वीचे वैभव प्राप्त व्हावे, यादृष्टीने प्रयत्न चालविले आहेत. मात्र गेली काही वर्षें कोरोना साथ, संप तसेच तत्पुर्वीच्या सत्ताधीशांचे रा. प. महामंडळाच्या व्यवस्थापनाकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष आदी कारणांमुळे एसटीचा डोलारा कोसळला आहे. त्यामुळे विकास कामांसाठी निधीची कमतरता निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यातील सर्वंच बस स्थानकांची अवस्था दयनीय झाली आहे.

विद्यमान परिस्थितीत कोकणातील सर्वंच बस स्थानकांच्या आवारातील डांबरीकरण, फ्लेवर्स बाॅक्स उखडले आहेत. त्यामुळे गाड्या स्थानकांतील फलाटांवर लावताना कोकणातील लाल मातीच्या धुळीचे साम्राज्य स्थानक परिसरात रौद्र रुप धारण करते, अशी माहिती देऊन ते म्हणाले, हा उडणारा धुरळा एसटी कर्मचार्यांसह प्रवाशांच्या नाका तोंडात जातो. दम्याची व्याधी असणार्या प्रवाशांना या धुळीच्या ॲलजीमुळे वारंवार दम्याचे झटके येतात. औषधोपचारांसाठी हजारो रुपये खर्च होतात. सर्दी खोकला प्रत्येकाच्या पाचवीला पुजला जातो. आवारातील दुकानदारांच्या पॅकबंद खाद्य पदार्थांवर धुळीचे थर जमा होतात. प्रसंगी ते फेकून द्यावे लागल्याने आर्थिक नुकसान होत आहे. एवढा अनर्थ या धुळीमुळे होत आहे.

रा. प. महामंडळाकडे सद्या निधीची कमतरता आहे. चालू हिवाळी अधिवेशनात अर्थमंत्र्यांनी आमदार निधीत भरघोस वाढ केली आहेच, असे स्पष्ट करुन ते म्हणाले, कोकणातील बहुतांश बस स्थानके मोडकळीस आली आहेत. दुरुस्तीच्याही पलिकडे गेली आहेत. कणकवलीसह अनेक बस स्थानकांची ती कोठे, कोठून कशी कोसळतील आणि जिवितहानी होईल याचा नेम नाही. त्यामुळे स्थानिक आमदारांनी या बस स्थानकांचे रुपडे पालटण्यासाठी आ. यामिनी जाधव यांच्या पेक्षाही आमदार निधीतून भरघोस आर्थिक निधी या स्थानकांच्या नूतणीकरणासाठी सढळ हस्ते द्यायला हवा. गजबजलेल्या स्थानकांतील विकास कामाचा उदोउदो प्रवाशी मतदारांच्या माध्यमातून होऊन आगामी निवडणुकीत आमदारांना त्याचा नक्कीच फायदा होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!