स्टॉल व्यवसायिकांच्या न्यायासाठी तहसीलदारांसोबत बैठक होणार
मालवण ( प्रतिनिधी) : मालवण बंदर जेटी परिसरातील बंदर विभागाच्या जागेतील स्टॉल काही दिवसांपूर्वी बंदर विभागाच्या सुचनेनंतर काढण्यात आले होते. पर्यटन हंगाम वाढत असताना पर्यटकांना सेवा सुविधा देत स्टॉल उभारणी बाबत प्रयत्न होत आहेत. मात्र बंदर विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी गेले गेले असता वाद निर्माण झाला. याबाबत स्टॉल व्यवसायिकांनी सतीश आचरेकर यांच्या नेतृत्वाखाली बंदर अधिकारी गोसावी यांची भेट घेतली. किनाऱ्यावर स्टॉल लावण्यास परवानगी मिळावी ही मागणी ठाम ठेवण्यात आली. चर्चेअंती तहसीलदारांशी बैठक घेऊन याबाबत तोडगा काढण्यात येईल, असे निश्चित करण्यात आले आहेत. दरम्यान, बंदर विभागाने स्टॉल लावण्यास परवानगी न दिल्यास प्रसंगी स्थानिक व्यवसायिकांच्या उपोषण केले जाईल, असा इशारा स्टॉल व्यवसायिकांच्या वतीने सतीश आचरेकर यांनी दिला आहे.
मालवण बंदर विभागाकडून मेरी टाइम बोर्डाच्या आदेशाने मालवण बंदर जेटी परिसरातील बंदर विभागाच्या जागेतील व किनाऱ्यावरील स्टॉल हटविण्यात आले. पुन्हा स्टॉल उभारत व्यवसाय सुरु करण्याचा प्रयत्न होत असताना बंदर अधिकारी व स्टॉल व्यावसायिक यांच्यात वादंग झाला. या पार्श्वभूमीवर किनाऱ्यावर स्टॉल लावणाऱ्या व्यवसायिकांनी एकत्र येत बंदर अधिकारी गोसावी यांची भेट घेतली तसेच किनाऱ्यावरील जागेची पाहणी केली. यावेळी सतीश आचरेकर, रोहन आचरेकर, अरुण तोडणकर, जॉनी फर्नांडीस, एजाज मुल्ला, आनंद आचरेकर, प्रसाद सरकारे, हेमंत रामाडे, दीपक तांडेल, स्वप्नील आचरेकर, अनमोल आढाव, राजू वाघ, हेमंत सारंग, संतोष गोवेकर, फातिमा मुजावर, दीपाली मेथर, हेलन फर्नांडिस, नागेश परब, खुशबू आचरेकर, विल्सन फर्नांडीस, नुरू मुजावर, दीपाली आचरेकर, जयश्री सकपाळ, वैष्णवी कुबल, जर्ना वाघ बानी सारंग, जेनीफर फर्नांडिस, जेनेव्हा ब्रिटो, स्नेहा तोडणकर, दादा जोशी, विनिता पेडणेकर, मोहिनी आचरेकर आदी उपस्थित होते.
यावेळी सतीश आचरेकर म्हणाले, बंदर विभागाच्या सूचनेनुसार जेटी परिसरातील स्टॉल धारकांनी बंदर विभागाला सहकार्य करून स्वतःहून स्टॉल हटविले होते. मात्र स्टॉल धारकांना जागा देण्याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. आम्ही स्टॉलधारक बंदर परिसरातील सर्वात पहिले व्यावसायिक असून गेली २० वर्षे स्टॉल चालवत आहोत. पर्यटकांना सेवा दिली जात आहे. अनेक स्थानिकांचा यावर उदरनिर्वाह आहे. तरी किनाऱ्यावर स्टॉल लावण्यास परवानगी मिळावी, असे सतीश आचरेकर म्हणाले. स्टॉल व्यवसाईकांच्या बाजूने सतीश आचरेकर यांनी आक्रमक भूमिका मांडली.चर्चे अंती स्टॉल धारकांची तहसीलदारांसमवेत बैठक घेऊन तोडगा काढण्यात येईल, असे बंदर अधिकारी गोसावी यांनी सांगितले.
