कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ञ डॉ. अर्पिता आचरेकर यांची नियुक्ती रद्द करा

आम आदमी पार्टीची रुग्णालय अधिक्षक डॉ. अनिकेत किर्लोस्कर यांच्याकडे मागणी ; अन्यथा आदोलन छेडण्याचा दिला इशारा

कणकवली (प्रतिनिधी): कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे सध्या स्त्रीरोगतज्ञ डॉ. अर्पिता आचरेकर या कार्यरत आहेत. मात्र या रुग्णालयात येणाऱ्या गरोदर मातांवर उपचार न करता त्यांना विनाकारण त्रास देण्याचा सातत्याने प्रयत्न त्या करीत आहेत. या बाबत आमच्याकडे अनेक महिलांच्या तक्रारी आलेल्या आहेत. डॉ. अर्पिता आचरेकर यांच्या उध्दट वर्तणुकीमुळे महिलांना त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी त्यांची नियुक्ती तात्काळ रद्द करण्यात यावी आणि त्यांची चौकशी करण्यात यावी. तसेच डॉ. आचरेकर यांनी गेल्या महिन्यामध्ये पत्रकार भगवान लोके यांनी गरोदर माता रुग्णसेवेबाबत बातमी लिहिली होती म्हणून त्यांना मोबाईल वरून धमकी दिली आणि उलट त्यांच्या विरोधात कणकवली पोलिस ठाण्यात तक्रार दिली. ही तक्रार देण्यापुर्वी जिल्हा शल्य चिकित्सक यांची परवानगी घेतली होती का ? याबाबतही डॉ. अर्पिता आचरेकर यांची चौकशी करण्यात यावी , अशी मागणी आम आदमी सिंधुदुर्गच्या वतीने जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर व ॲडव्होकेट संदिप वंजारे यांनी केली आहे.
उपजिल्हा रुग्णालय अधिक्षक डॉ. किर्लोस्कर यांना दिलेल्या निवेदनात खालील मागणी केली आहे. त्यात कणकवली उपजिल्हा रुग्णालय हे मध्यवर्ती असल्याने मोठ्या प्रमाणात गोरगरीब रुग्ण उपचारासाठी येत असतात. या रुग्णालयात डॉ. ज्ञानेश्वर सोडल , डॉ. सी.एम.शिकलगार या स्त्रीरोगतज्ञ डॉक्टरांनी चांगली सेवा देत रुग्णालयाचे नावलौकीक वाढवले होते. आता डॉ. अर्पिता आचरेकर नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत कंत्राटी पद्धतीने सेवेत असुन देखील उपचार करण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. महिला रुग्णांना स्वत: तपासणी न करताच ओरोस किंवा कुडाळ या सरकारी रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला देतात. त्यामुळे सर्वसामान्य गोरगरीब महिलांना खाजगी रुग्णालयात जाऊन नाईलाजाने उपचार घ्यावे लागतात. उपचार करण्यात कामचुकार करण्यासाठी गरोदर महिलांना घाबरवुन सिझेरियन करावे लागेल असा चुकीचा सल्ला डॉ. अर्पिता आचरेकर या देतात. महिलांची प्रसुती करताना स्वत : लक्ष न देता सिस्टर कडून करुन घेतात. त्यानंतरचे उपचार आपल्या खाजगी दवाखान्यात करावे असा आग्रह डॉ. अर्पिता आचरेकर यांचा असतो. त्यांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयापासून जवळच अथर्व क्लिनिक या नावाने स्वत:चा खाजगी दवाखाना सुरु केला आहे. सरकारी रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांना ब-याचदा डॉ. आचरेकर या आपल्या खाजगी रुग्णालयात बोलवत असल्याच्या अनेक महिलांच्या तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत. त्यामुळे डॉ. अर्पिता महेंद्र आचरेकर यांची खाते निहाय चौकशी करुन नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत कंत्राटी नियुक्ती रद्द् करावी . त्यारिक्त जागी कायमस्वरुपी किंवा कंत्राटी पद्धतीने स्त्रीरोगतज्ञांची नियुक्ती करण्यात यावी . अन्यथा आपल्या कार्यालयासमोर लोकशाही पद्धतीने आम आदमी पार्टी सिंधुदुर्गच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल त्याची नोंद घ्यावी. असा इशारा विवेक ताम्हणकर यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!