सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक वाचन मंदिरांना ती अक्षरभेट देणार!”- किरण उर्फ भैय्यासाहेब सामंत
आचरा (प्रतिनिधी) : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेने अलीकडे प्रकाशित केलेली ‘बीज अंकुरे अंकुरे’ (ललित) आणि ‘ये ग ये ग सरी’ (कविता संग्रह) ही दोन्ही पुस्तके म्हणजे वाचकांसाठी अक्षरमेवा आहे. दोन्ही पुस्तकातील जवळजवळ २० लेखक आणि २५ कवी हे माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत. आणि नवोदित आहेत. माझ्या जन्मगावच्या जिल्ह्याने हा केलेला अभिनव प्रयोग महाराष्ट्रात अन्य कुठेही झाला नाही. मी हे दोन्ही ग्रंथ माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जवळजवळ १३० ग्रंथालयांना नवीन वर्षाची आणि माझ्या वाढदिवसाची अक्षर भेट म्हणून विनामूल्य देणार आहे माझ्या जिल्ह्यातील सर्व चोखंदळ वाचकांनी या ग्रंथाचा लाभ घ्यावा,” असे गौरवोद्गार सामाजिक कार्यकर्ते आणि चोखंदळ वाचक किरण सामंत उर्फ भैय्यासाहेब सामंत (रत्नागिरी) यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना काढले. त्यांचे समवेत त्यांचे स्नेही महेश राणे, संपादक सुरेश ठाकूर हे होते. कोकण मराठी साहित्य परिषद मालवणचे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांनी त्यांना हे दोन्ही ग्रंथ भेट दिले. त्यावेळी त्यांनी ही इच्छा प्रकट केली. दोन्ही ग्रंथांचे संपादन सुरेश ठाकूर यांनी केले असून सत्त्वश्री प्रकाशन रत्नागिरी यांनी या दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन केले आहे. पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनीही “असा अभिनव साहित्यिक प्रयोग प्रथमच कोकण मराठी साहित्य परिषदेची मालवण शाखा करीत आहे,” असे गौरवोद्गार काढले आहेत.
अक्षर भेट वितरण सोहळा रामेश्वर वाचन मंदिर आचरे येथे होणार आहे.सदर अक्षर ग्रंथभेट योजनेचा शुभारंभ मंगळवार दिनांक २ जानेवारी २०२४ रोजी दुपारी ठीक तीन वाजता रामेश्वर वाचन मंदिर आचरेच्या १३० व्या वर्धापनदिनी होणार आहे. यावेळी किरण उर्फ भैय्यासाहेब सामंत यांचे स्नेही महेश राणे दोन्ही ग्रंथ अनुक्रमे बाबाजी भिसळे (अध्यक्ष) आणि अर्जुन बापर्डेकर (कार्यवाह), रामेश्वर वाचन मंदिर, आचरे यांना प्रदान करणार आहेत. त्यानंतर इतर १३० वाचनालयांना ग्रंथ वितरित होतील.सुरेश शामराव ठाकूर (अध्यक्ष) आणि कोमसाप मालवण कार्यकारिणी तसेच बीज अंकुरे अंकुरेचे सर्व लेखक आणि ये ग ये ग सरी चे सर्व कवी यांनी किरण उर्फ भैय्यासाहेब सामंत यांचे आभार व्यक्त केले.