चिरे वाहतूक करणारा ट्रक पलटी होऊन ट्रकचा झाला चक्काचूर
चालक आणि क्लीनर बालबाल बचावले
समोरून दुचाकीने प्रवास करणारे पोलीस कर्मचारीही सुदैवाने बचावले
चौके (अमोल गोसावी) : शुक्रवारी रात्री 9.15 वाजता मालवण-कसाल मार्गांवरील कुणकवळे येथील कुपेरीची घाटीत कुणकावळे ग्रामपंचायत नजीक चौके ते बेळगाव अशी चिरे वाहतूक करणारा ट्रक पलटी होत भीषण अपघात झाला. या अपघातात केवळ दैव बलवत्तर म्हणून चालक व क्लीनर सुदैवाने बाल बाल बचावले. तसेच या मार्गावरून कट्टा ते मालवण असा दुचाकीने प्रवास करणारे पोलीस कर्मचारी यांच्या दुचाकी समोरच अपघात घडल्याने तेही बचावले. मात्र या अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की सदर ट्रक (KA-31-7165) हा नेहमीप्रमाणे चौके ते बेळगाव अशी चिरे वाहतूक करायचा शुक्रवारी रात्री नऊ वाजता चिरे भरून चौकेतून निघालेला ट्रक कुपेरी ची घाटी उतरत असताना अचानक ट्रक मध्ये बिघाड झाल्याने ट्रक रस्त्यावरच पलटी झाला. हा अपघात दूचाकीने मालवण येथे जाणारे कट्टा दूरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी सिद्धेश चीपकर यांच्या अगदी समोरच घडला. परंतु त्यांच्या सुदैवाने ते या अपघातातून वाचले.
एवढा मोठा भीषण अपघात होऊनही ट्रक मधील चालक- क्लिनर तसेच अपघाताच्या स्थळी समोरच दुचाकीवर असलेले पोलीस कर्मचारी सिद्धेश चिपकर यांचे दैव बलवत्तर म्हणून कोणतीही दुखापत न होता सुखरूप बचावले. चिपकर यांना क्षणभर काही कळलेच नाही तरीही त्याच परिस्थितीत त्यांनी अपघातातील चालक व क्लीनर यांना सुखरूप बाहेर काढून धीर देत बाजूला बसवले. अजून थोडा जरी वेळ आतमध्ये अडकले असते तर त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला असता मात्र पोलीस कर्मचारी चिपकर हे देवदूता सारखे धावले आणि त्यांचे प्राण वाचवले.
अपघाताची बातमी समजतात कुणकवळे -चौके -साळेल येथील ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेत अपघातग्रस ट्रक जेसीबीच्या साह्याने रस्त्यावरुन बाजूला करत वाहतूक सुरळीत केली. यावेळी कुणकवळे सरपंच मंदार वराडकर, सामाजिक कार्यकर्ते पप्पू वराडकर, चौक येथील चिरेकर व्यावसायिक बिजेंद्र गावडे, संतोष गावडे, मोहन गावडे यांच्यासह कुणकावळे चौके साळेल येथील ग्रामस्थांनी अपघातस्थळी मदत कार्यात सहभाग घेतला .