रेल्वे स्टेशन जो पर्यंत होत नाही तोपर्यंत आपण संघर्ष करत राहू – संतोष तथा बाळा कांदळकर
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : कोंकण रेल्वेच्या पहिल्या सर्व्हेत कसाल येथे रेल्वे स्टेशन होते. कोंकण रेल्वेच्या माध्यमातून काढलेल्या कॅलेंडर मध्ये कसाल रेल्वे स्टेशन दाखवण्यात आले होते. या ठिकाणी रेल्वे स्टेशन व्हावे यासाठी मालवण, कणकवली, कुडाळ तालुक्यातील तब्बल २२ ग्रामपंचायतींनी आपले ठराव दिले आहेत, असे असतानाही कसाल रेल्वे स्टेशन संदर्भात कोणतीच हालचाल दिसत नाही. त्यामुळे हे रेल्वे स्टेशन जो पर्यंत होत नाही तोपर्यंत आपण संघर्ष करत राहू असे कसाल रेल्वे स्टेशन संघर्ष समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष संतोष तथा बाळा कांदळकर यांनी स्पष्ट केले आहे.
कसाल येथे रेल्वे स्टेशन व्हावे यासाठी गेली ३० वर्ष प्रयत्न सुरू आहेत. मात्र याला यश येत नाही. यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावे यासाठी कसाल येथे शुक्रवारी ग्रामस्थांची बैठक कसाल सरपंच राजन परब यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत कसाल रेल्वेस्टेशन संघर्ष समिती स्थापन करण्यात आली. या समितीवर अध्यक्ष म्हणून संतोष (बाळा) कांदळकर, उपाध्यक्ष संजय वाडकर, सचिव साईनाथ आंबेरकर, खजिनदार गणपत कसालकर, सदस्य निलेश कामतेकर, मिलिंद सावंत, कृष्णा आंबेरकर, चिन्मय पावसकर, देवेंद्र तेली, संदिप सातार्डेकर, देवेंद्र कसालकर, सौ.सुलभा परब, सौ.गौरी पाताडे तर सल्लागार म्हणून कसाल सरपंच राजन परब,अवधूत मालणकर, नवीन बांदेकर, मधुकर राणे, गोपाळ हरमलकर, उमाकांत पालव, लवू म्हाडेश्वर, विनोद परब, रविद्र गावडे, महेश बांदेकर, आत्माराम परब, सायमन फर्नांडिस, नारायण आचरेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते नंदन वेंगुर्लेकर, तंटामुक्ती अध्यक्ष अवधुत मालणकर, उपसरपंच शंकर परब, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कसाल गाव हा मुंबई गोवा या महामार्गावर असून या ठिकाणी रेल्वे स्टेशन झाल्यास त्याचा उपयोग जिल्ह्यातील सर्व रेल्वे प्रवाशांना व नागरिकांना होणार आहे. यासाठी कसाल सह आजूबाजूच्या सुमारे 22 गावांनी ग्रामसभेचे ठरावही संमत केले आहेत. या ठिकाणी रेल्वे स्टेशन व्हावे यासाठी गेले तीस वर्ष प्रयत्न सुरू आहेत. तरी अद्याप त्याला यश मिळालेले नाही. त्यामुळे रेल्वे स्टेशन होण्यासाठी अधिक तीव्रतेने प्रयत्न व्हावेत. यासाठी संघर्ष समितीच्या माध्यमातून लढा उभारला जाणार आहे. या बैठकीत रेल्वे स्टेशन व्हावे यासाठी करावे लागणारे प्रयत्न याबाबतची रूपरेषा निश्चित करण्यात आली आणि जो पर्यंत आपल्याला यश मिळत नाही. तोपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा तसेच हा लढा अधिक तीव्र करण्याचा निश्चय करण्यात आला.