उद्योग कर्जाच्या आमिषाने आर्थिक फसवणूक ; युवकाविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल

फसवणूक झालेल्या महिलेने सोशल मीडियावर त्या युवकाची छबी झळकवताच प्रकरण गेले पोलीस ठाण्यात

कणकवली (प्रतिनिधी) : महिला तसेच युवकांसाठी स्वतःचा उद्योग करण्यासाठी शासनाच्या विविध उद्योग योजना असतात. ज्यात लागणाऱ्या भांडवलासाठी खादी ग्रामोद्योग सारख्या अन्य अनेक संस्थाकडून शासकीय उद्योग कर्ज दिले जाते.याचा फायदा घेत तालुक्यातील एका गावातील युवकाने अनेकांकडून कमिशन स्वरूपात हजारोंच्या पटीत ऍडव्हान्स रक्कम घेतली.अशाच एका महिलेकडून घेतलेल्या रक्कमेनंतर व्यवहार फिसकटल्यामुळे घेतलेली रक्कम परत मिळण्यासाठी तिने तगादा लावला.मात्र त्या युवकाने काही दखल घेतली नाही. अखेर आपली आर्थिक फसवणूक होतेय हे लक्षात येताच त्या महिलेने मनाशी ” सु ” नियोजित विचार करून त्या युवकाकडून पैसे “निल ” करण्यासाठी त्याची छबीच थेट सोशल मीडियावर झळकवली. याचा राग येऊन त्या युवकाने महिलेला स्वतः आत्महत्या करण्याची धमकी दिली. त्यानंतर हे प्रकरण पोलीस ठाण्यात गेले. चर्चेअंती त्या महिलेकडून घेतलेली रक्कम 8 दिवसांत परत करण्याचे मान्य करत हा विषय तूर्तास संपवला . दरम्यान याबाबत त्या युवकाविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला असून अशा प्रकारे अनेकांकडून काही लाख रुपये त्या युवकाने घेतल्याची चर्चा सुरू आहे.

error: Content is protected !!