कामाप्रति निष्ठा आणि समर्पण वृत्तीने काम करत किंजवडेकर यांनी कार्याचा ठसा उमटवला – अजयकुमार सर्वगोड

कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागतील वरिष्ठ लिपिक लवेंद्र किंजवडेकर यांचा सेवानिवृत्तीनिमित सत्कार

कणकवली (प्रतिनिधी) : शासकीय कामाप्रति असलेली निष्ठा आणि समर्पण वृत्तीने तब्बल 38 वर्षांच्या शासकीय सेवेतून सलवेंद्र किंजवडेकर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. किंजवडेकर यांच्यासारखे अनुभवी कर्मचारी सेवानिवृत्त होणे ही मोठी पोकळी आहे असे उद्गार कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी काढले.सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली कार्यालयातील लेखा विभागातील वरिष्ठ लिपिक लवेंद्र सिताराम किंजवडेकर हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. किंजवडेकर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त छोटेखानी सत्कार कार्यकारी अभियंता दालनात आयोजित करण्यात आला होता. किंजवडेकर यांचाकार्यकारी अभियंता सर्वगोड यांच्या हस्ते भेटवस्तू, शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कणकवली उपअभियंता के.के.प्रभू, वैभववाडी उपअभियंता विनायक जोशी, कार्यालय अधीक्षक श्रीमती पराडकर, चालक शैलेश कांबळे, संदेश घाणेकर, राजन चव्हाण, महानंदा चव्हाण,नामदेव जाधव, चंदू भोसले, राजेंद्र चव्हाण, महेंद्र चव्हाण, आनंद जाधव, अंकुश किंजवडेकर, पिडब्ल्यूडी विभागीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी वृंद उपस्थित होते. यावेळी बोलताना सर्वगोड म्हणाले की, सार्वजनिक बांधकाम कणकवली विभागात मागील वर्षभरात मोठ्या प्रमाणात विकासकामे मंजूर झाली आहेत. याचा प्रशासकीय भार हा ऑफिस कर्मचाऱ्यांवर येतो. जिल्ह्याचा सर्वांगीण पायभूत विकास व्हावा यासाठी आम्ही रात्रंदिन झटत आहोत. मालवण तालुक्यात 183 किमी रस्त्याचे नूतनीकरण केले आहे. दर्जेदार रस्ते सुविधा निर्माण केल्यामुळे मालवण, देवगड ला येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे.भारतीय नौसेनादिन साजरा होत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या राजकोट किल्ल्याचे दर्जेदार नूतनीकरण अगदी दोन महिन्यांत कणकवली पिडब्ल्यूडी विभागाने पूर्ण केले आहे. राजकोट किल्ला जगाच्या पर्यटन नकाशावर यानिमित्ताने पोचवण्याचे भाग्य कणकवली पिडब्ल्यूडी विभागाला मिळाले आहे.दरदिवशी 2 हजार पर्यटकांनी सुट्टी कालावधीत राजकोट किल्लादर्शन केले आहे. या सगळ्या कामाचा भार हा पिडब्ल्यूडी च्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांवर येत असतो. साहजिकच अशा वेळी प्रशासकीय वेळेबाहेर सुद्धा काम करणे कार्यालयीन कर्मचाऱ्यांना अनिवार्य ठरते. आपल्या आरोग्याचा महत्वाचा प्रश्न असूनही किंजवडेकर यांनी आपल्या लेखा शाखेच्या कामाला प्राधान्य दिले. यातून त्यांची आपल्या शासकीय कामाप्रति असलेली निष्ठा आणि समर्पण वृत्ती दिसून येते. उपअभियंता विनायक जोशी म्हणाले की लेखा शाखेचे काम हे अत्यंत महत्वाचे असते. अकाउंट जुळणी करताना अनेक अडचणी असतात. स्वतः काम करत असताना इतरांकडून काम करून घेण्याची किंजवडेकर यांची शैली होती. सत्काराला उत्तर देताना लवेंद्र किंजवडेकर भारावून गेले होते. सर्व अधिकारी, आणि कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभल्यामुळे माझी शासकीय सेवा पूर्ण करू शकलो. लिपिक ,स्टोअर किपर , वरिष्ठ लिपिक पदावर 38 वर्षांच्या सेवेत कणकवली, सावंतवाडी, विभागीय कार्यालयात सेवा केली. ज्या ज्या शाखेत काम केले तिथे अत्यंत प्रामाणिक आणि समर्पक वृत्तीने काम केले. आजचे काम आजच हातावेगळे केले तर उद्या होणार कामाचा अधिकचा भार कमी होतो ही खूणगाठ मनाशी बांधून शासकीय सेवा केली.यावेळी उपअभियंता श्रीमती प्रभू, राजन चव्हाण, महानंदा चव्हाण, नामदेव जाधव, आनंद जाधव, अंकुश किंजवडेकर यांनी लवेंद्र किंजवडेकर यांना मननोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन व आभार आनंद कासार्डेकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!