अपघातांचे सत्र अजूनही सुरु; अपूर्णावस्थेतील रस्त्यामुळे वागदेत अपघात

कणकवली (प्रतिनिधी) : महामार्ग चौपदरीकरण अंतर्गत अपूर्ण अवस्थेत राहिलेली वागदे येथील कणकवलीच्या दिशेने येणारी लेन सातत्याने अपघातांना निमंत्रण देत आहे. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास एका कारला पाठीमागून येत असलेल्या कारची धडक बसली. अर्धवस्थेतील खड्ड्यामुळे रस्ता अचानक लक्षात न आल्याने कार चालकाने कारचा वेग अचानक कमी केला. परिणामी मागून आलेल्या कारची समोरील कारला धडक बसली. अपघातात कोणीही जखमी झाले नाही. तरीदेखील दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले.

महामार्ग चौपदरीकरणात वागदे येथील जवळपास १५० मीटर लेन रस्ता अद्याप अपूर्ण अवस्थेत आहे. जमीनधारकांना मोबदला मिळाला नसल्याच्या कारणास्तव ही लेन बंद होती. ग्रामस्थ, संबंधित अधिकाऱ्यांनी आपसात चर्चा करून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लेन तात्पुरत्या स्वरूपात सुरू केली. ती अद्यापही सुरू आहे. मात्र जेमतेम खडी पसरवून सुरू केलेल्या या रस्त्यावर अक्षरश: खड्डे पडलेले आहेत. परिणामी गोव्याहून मुंबईच्या दिशेने येताना हा काम न झालेला शंभर मीटरचा रस्ता अचानक समोर येतो. तेव्हा हा भाग वाहनचालकांच्या लक्षात येत नाही. बऱ्याचदा या ठिकाणी दुचाकी घसरून अपघात झालेले आहेत. तर तेथे चार चाकीसारख्या वाहनांचा वेग अचानक कमी होतो व मागाहून येणाऱ्या वाहनाची समोरील वाहनाला धडक बसण्याचे प्रकार घडतात. गुरुवारी झालेला अपघात तशाच पद्धतीने घडला होता. त्यामुळे लवकरात लवकर प्रशासनाने या पाठ फिरवलेल्या प्रश्नाकडे लक्ष देऊन तो १५० मीटरचा रस्ता पूर्ण करावा, असे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे.

error: Content is protected !!