खारेपाटण केंद्र शाळेचे काम कौतुकास्पद – मंत्री दादा भुसे
खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने सध्या राज्यभर राबविण्यात येत असलेल्या “चला शाळेकडे जावूया ” या उपक्रमाची सुरवात खारेपाटण सारख्या प्राथमिक शाळेत यापूर्वीपासूनच सुरू असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान असून या शाळेच्या शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीचे व ग्रामस्थांचे कार्य कौतुकास्पद हे कौतुकास्पद असल्याचे भावपूर्ण उदगार महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादासाहेब भुसे यांनी खारेपाटण जिल्हा परिषद केंद्र शाळा नं.१ येथे सदिच्छा भेटी प्रसंगी काढले.
शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दौऱ्यावर आले असता त्यांनी बुधवार दि.७ सप्टेंबर २०२६ रोजी सायं.५.०० वाजता कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा नं.१ ला सदिच्छा भेट दिली .यावेळी त्यांच्या समवेत शिवसेना उपनेते संजय आंग्रे,
कणकवली विधानाभा प्रमुख संदेश पटेल,कणकवली तालुका प्रमुख मंगेश गुरव,जि.प.सदस्य प्राची ईसवलकर,पं.स.सदस्य गुरुप्रसाद शिंदे,खारेपाटण माजी सरपंच रामकांत राऊत,जि.प.केंद्र शाळा खारेपाटण च्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मंगेश ब्रम्हांदंडे,माजी अध्यक्ष संतोष पाटणकर, प्राप्ती कट्टी, उपाध्यक्ष सौ संध्या पोरे,ग्रा.पं. सदस्य सौ शितीजा धुमाळे, अस्ताली पवार,शा.व्य.समिती सदस्य सुहास राऊत,सौ योगिनी पोमेडकर,शिल्पा मेस्त्री, तसेच खारेपाटण केंद्र शाळेच्या मुख्याद्यापिका सौ आरती जोजेन व शाळेचे शिक्षक,विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी खारेपाटण केंद्र शाळा व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच शिवसेना कणकवली तालुका प्रमुख मंगेश गुरव यांच्या वतीने देखील मंत्री भुसे यांचा सत्कार करण्यात आला.या भेटी दरम्यान मंत्री दादासाहेब भुसे यांनी खारेपाटण केंद्र शाळेच्या वर्गखोल्या व परिसराची पाहणी केली.तसेच शालेय विद्यार्थ्यां सोबत थेट संवाद साधत त्याच्याशी हितगुज केले.व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.या भेटी दरम्यान मंत्री भुसे यांनी खारेपाटण प्राथमिक केंद्र शाळेविषयी समाधान व्यक्त केले.
पुढे बोलताना मंत्री दादा भुसे म्हणाले या शाळेला आवश्यक असणारी मदत प्रशासनाकडून केली जाईल.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण प्राथमिक केंद्र शाळा सारख्या आदर्श मॉडेल स्कूल असलेल्या आदर्श शाळा राज्यात अजून घडल्या पाहिजेत.त्यामुळे राज्यातील इतर शाळांनी खारेपाटण केंद्र शाळेचा आदर्श
घ्यावा.असे आवाहन देखील त्यांनी आपल्या मार्गदर्शनात केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शाळा व्यवस्थापन समितिचे माजी अध्यक्ष संतोष पाटणकर यांनी केले.तर सर्वांचे आभार मंगेश गुरव यांनी मानले.











