मालवण (प्रतिनिधी) : सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेऊन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपला पहिला अंतरिम आणि एकूण सहावा अर्थसंकल्प सादर केला. आगामी निवडणुका बहुमताने जिंकून जून महिन्यात लोकाभिमुख आणि देशाला आर्थिक महासत्ता बनवण्याच्या दिशेने पावले टाकण्याची हमी या अंतरिम अर्थसंकल्पात स्पष्ट दिसत आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या भाषणात कोणतीही लोकप्रिय घोषणा केलेली नाही, मात्र आगामी ३ वर्षात कोणत्या योजना पूर्ण करण्याचे लक्ष्य सांगितले त्यातून जून २०२४ मध्ये पूर्ण अर्थसंकल्प कसा असेल याची झलक दिसली आहे. सामान्य जनतेच्या फायद्याच्या योजना पुढे चालू ठेवताना पहिले ४ महिने सरकारी उत्पन्नात घट होणार नाही याकडे ध्यान दिले आहे.
कर प्रस्तावात त्यांनी सामान्यावर कोणतेच ओझे टाकले नाही, करप्रणालीत सुसूत्रता ठेवताना स्टार्ट अप प्रकल्पांना काही विशिष्ट करसवलती देण्याची तारीख ३१-०३-२०२५ पर्यंत पुढे नेली आहे. उद्योग जगातला दिलासा देताना कॉर्पोरेट कर २२% पर्यंत कमी केला आहे. देशातील पायाभूत सुविधांचा विकास करण्याची घोषणा करताना रेल्वे जाळ्याचे ३ मोठे मार्गिका प्रकल्प प्रस्तावित आहेत हे स्वागतार्ह आहे. ४० हजार नविन डबे बदलण्याची घोषणा सुखकारक प्रवासाची नांदी आहे. पर्यटनासाठी प्रोत्साहन दिले आहे त्यातून रोजगार निर्मिती होईल.
निवडणुका जवळ असताना मर्यादा पाळून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संतुलित अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे. असे मत गोगटे जोगळेकर कॉलेज रत्नागिरीचे माजी प्राचार्य उदय बोडस यांनी व्यक्त केले आहे.