” आम्ही मालवणी ” तर्फे, एकांकिका स्पर्धा २०२४ चे आयोजन !

बोलीभाषेचा जागर अन् संवर्धना साठी उदंड प्रतिसादाची अपेक्षा – विठ्ठल सावंत,समूह सदस्य

फोंडाघाट (प्रतिनिधी) : “आम्ही मालवणी ” हा जवळपास दोन लाख सदस्य संख्या असलेला मालवणी मुलूख, मालवणी भाषा,मालवणी मुलखातील संस्कृती, निसर्ग,परंपरा, खाद्यपदार्थ या सर्वांवर जिवापाड प्रेम करणाऱ्या मालवणी माणसांचा समूह ! या समूहांने मालवणी मुलूखातील कलाकारांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी, आणि मालवणी या बोलीभाषेची रंगकर्मींमध्ये जास्तीत जास्त उजळणी होण्यासाठी ” मालवणी एकांकिका स्पर्धेचे आयोजन केलेले आहे.

आपल्या महाराष्ट्रात अनेक बोलीभाषा आहेत.त्या पैकी आपल्या सिंधुदूर्ग जिल्ह्यात बोलली जाते ती आपली मालवणी बोलीभाषा ! प्रत्येक दहा ते बारा कोसावर ही भाषा बदलत जाते. आपल्या सिंधुदूर्ग जिल्ह्यातील एका तालुक्यातील बोली भाषेत आढळणारे शब्द, त्या शब्दांचे उच्चार, भाषेचा हेल.भाषेचा लहेजा दुस-या तालुक्यात काही अंशी बदललेला दिसून येतो.दोडामार्ग हा तालुका गोवा या राज्याला लागून असल्यामुळे या प्रदेशात मालवणी बोलीभाषेवर कोकणी भाषेचा प्रभाव आढळतो.तर रत्नागिरी जिल्हयाची हद्द संपते त्या खारेपाटण जवळील भाषेत राजापूर तालुक्यात बोलल्या जाणाऱ्या भाषेचा लहेजा ऐकायला मिळतो.आपल्या सिंधुदूर्गात फिरतांना तिथल्या लोकांशी बोलतांना कोसा कोसावर बदलत जाणारा हा मालवणी भाषेतील फरक आपल्याला जाणवत असतो..हा फरक म्हणजे सिंधुदूर्ग जिल्ह्यातील त्या- त्या तालुक्यात बोलल्या जाणा-या मालवणी बोलीभाषेचे एक एक अविष्कार आहेत. या सर्व तालुक्यातील म्हणजे दोडामार्ग,सावंतवाडी,वेंगुर्ला कुडाळ,मालवण,कणकवली, देवगड,वैभववाडी या पट्ट्यात बोलल्या जाणा-या बोलीभाषेचा आधार घेऊनच आपल्याला एकांकिका सादर करायची आहे.या प्रत्येक तालुक्यातील बोलींचे एकात्म रुप म्हणजे आपल्या सिंधुदूर्ग जिल्ह्यात बोलली जाणारी मालवणी बोलीभाषा या आपल्या मालवणी भाषेबद्दल बोलतांना ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक म्हणाले होते की,” मराठी भाषेची सागर किना-या वरील एक सुंदर लेक म्हणजे ” मालवणी भाषा ! खरच आपली ही मालवणी भाषा एवढी सुंदर आणि गोड आहे की, आपण ती बोलायला लागलो की समोरच्याला ऐकत रहावीशी वाटते.. आज तर ही भाषा मालवणी नटसम्राट स्व.मच्छिंद्र कांबळी यांच्या मुळे सातासमुद्रांपलीकडे पोहचली आहे.आज या भाषेतून साहित्यनिर्मिती होत आहे..मालिका निघत आहेत..या भाषेतील नाटकांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे..हा प्रतिसाद अजून वृध्दींगत व्हावा, म्हणूनच ” आम्ही मालवणी ” समूहांने या मालवणी एकांकिका स्पर्धेचे आयोजन केलेले आहे.१९८४ – १९८५ च्या आसपास निर्माते अभिनेते,स्व.मच्छिंद्र कांबळी यांनी आपल्या भद्रकाली प्रॅाडक्शन तर्फे मालवणी एकांकिका स्पर्धा घेतली होती.त्यावेळी परेलच्या शिरोडकर हायस्कूलमध्ये ही स्पर्धा घेतली गेली होती.सलग दोन वर्षे ही स्पर्धा चालली आणि नंतर बंद झाली..त्यानंतर २०२४ मध्ये प्रथमच या स्पर्धेचे आयोजन होत आहे. मालवणी बोलीभाषेचे जतन व्हावे.जास्तीत जास्त लोकांपर्यंत तिचा प्रसार व्हावा,मालवणी मुलखातील,तसेच मुंबई, महाराष्ट्रातील मालवणी बोलणाऱ्या कलाकारांना आपले कलागुण सादर करण्यासाठी हक्काचा रंगमंच मिळावा,,मालवणी एकांकिका लिहिणारे लेखक तयार व्हावेत या हेतूनेच या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धेसाठी नियमावली पुढीलप्रमाणे आहे.

१) ही स्पर्धा हौशी आणि महाविद्यालयीन गट या सर्वांसाठी खुली आहे.

२) एकांकिका ही पूर्णता मालवणी भाषेतच असावी.त्याचप्रमाणे मालवणी मुलखातील संस्कृतीचे दर्शन एकांकिकेत प्रतिबिंबित होणे आवश्यक आहे.एकांकिका मुंबईत घडत असेल तर एकांकिकेतील व्यक्तिरेखा या मालवणीच पाहिजेत.मालवणी परिवाराचे सुख दु:ख सदर एकांकिकेत दिसले पाहिजे.काही स्पर्धक गाजलेली एकांकिका मालवणीत अनुवादीत,रूपांतरित करतात..समजा तो विषय वैश्विक ( युनिक) आणि मालवणी मातीत चपखलपणे बसत असेल तर चालण्यासारखे आहे..पण पात्र फक्त मालवणीत बोलतात,आणि मालवणी मुलखाशी त्याचा काही सबंध नाही असे असेल तर ती एकांकिका बाद करण्यात येईल.

३) धार्मिक, जातीय भावना सुखावणारे विषय,राजकिय नेत्यांवर ,थेट टिकाटिपण्णी,अश्लीलता इत्यादी आक्षेपार्ह गोष्टी नसाव्यात.

४) प्रवेश अर्ज गुगल लिंक ओपन करुन भरावा.लींक सोबत देत आहोत.प्रवेश फी रु.१०००/- आशिष राणे यांच्या ९४०४४४१६७८ या गुगल पे नंबरवर जमा करावी, व स्क्रीनशॅाट फाईल online अर्जासोबत पाठवावी..किंवा खाली जे आयोजकांचे नंबर दिले आहेत,त्या नंबरवर इतर तपशीला सोबत पाठवून द्यावी. प्रवेश फी भरल्या नंतरच आपला प्रवेश अर्ज स्वीकृत समजण्यात येईल.प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख आहे २८ फेब्रुवारी २०२४.

५) एकांकिकेच्या प्रवेश अर्जाची नोंदणी करतांना सादरीकरण करणाऱ्या संस्थेने लेखकाचे परवानगी पत्र,रंगभूमी परिनिरिक्षण ( Censor Board) प्रमाणपत्र,संहितेची पी.डी.एफ.प्रत जोडणे आवश्यक आहे..सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र नसेल तर सेन्साॅरला दिलेली पावती चालेल.

६) प्राथमिक फेरीत प्रयोग सादर करतांना, नेपथ्य,रंगभूषा,वेशभूषा,प्रकाश योजना या तांत्रिक बाबी कटाक्षाने टाळाव्यात.

७)एकांकिका सादरीकरणाची वेळ ३५ ते चाळीस मिनिटांची असावी.

८) एकांकिका स्पर्धा ही प्राथमिक आणि अंतिम फेरी अशा दोन फे-यांमध्ये घेतली जाईल.प्राथमिक फेरी ही मुंबईत आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाणी घेण्याचा मनोदय आहे.त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कमीत कमी सात स्पर्धक संस्थांनी प्रवेश नोंदविणे आवश्यक आहे.४ एप्रिल हा स्व. मच्छिंद्र कांबळी यांचा जन्म दिवस ” मालवणी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो.त्या दिवशी प्राथमिक फेरी घेण्यात येईल,व अंतिम फेरी मुंबईतील बंदिस्त नाट्यगृहात दिनांक ७ एप्रिल २०२४ रोजी होईल.

९)परिक्षकांचा निर्णय हा अंतिम राहील.त्यावर वाद घालू नये ही विनंती.

१०) पारितोषिक
प्रथम – रोख रुपये १५,०००/- प्रशस्तीपत्र ,आणि मानचिन्ह.
द्वितीय – रोख रुपये १०,०००-प्रशस्ती पत्र,आणि मानचिन्ह.
तृतीय – रोख रुपये ७०००/- प्रशस्तीपत्र,आणि मानचिन्ह.

याच प्रमाणे,दिग्दर्शन, अभिनय( पुरुष आणि स्त्री) ,प्रथम द्वितीय, आणि तृतीय क्रमांक यांना रोख रुपये,प्रशस्ती पत्र,व सन्मान चिन्हे देण्यात येतील.
इतर श्रेणीत लेखक,नेपथ्य, प्रकाशयोजना, वेशभूषा,यामध्ये प्रत्येकी दोन विजेते निवडण्यात येतील, त्यांना रोख रुपये,प्रशस्तीपत्र,व मानचिन्ह देण्यात येईल.
या एकांकिका स्पर्धेसाठी नवीनच लिहिलेल्या व परिक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकांकिका लेखकाचा ,व विनोदी अभिनेता,व विनोदी अभिनेत्री यांचा ही रोख रुपये,प्रशस्ती पत्रक,व मानचिन्ह देऊन विशेष सन्मान करण्यात येईल. प्राथमिक व अंतिम फेरीत सहभाग असणा-या सर्व कलाकार,तंत्रज्ञांना आम्ही मालवणी तर्फे सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.

११) कार्यक्रम आणि नियमावली यात फेरबदल करण्याचे सर्व अधिकार आम्ही मालवणी संचालक मंडळाकडे राखीव आहेत. आपले प्रवेश अर्ज प्राप्त होत जातील तसा वॉट्स ॲप ग्रुप करण्यात येईल व आपल्या संस्थेच्या दोन प्रतिनिधींचा या ग्रुपमध्ये समावेश करुन वेळोवेळी या स्पर्धेबद्दल माहिती देण्यात येईल.

आम्ही मालवणीची ही पहिलीच मालवणी बोलीभाषेतील एकांकिका स्पर्धा यशस्वी होण्यासाठी जास्तीत जास्त स्पर्धक संस्थांनी सहभाग नोंदवा.

           संपर्क

श्री.विठ्ठल सावंत- ९८२०८४५२४८
श्री.प्रदीप तोंडवळकर – ९८८४८३२२१८
श्री.सतेज कृष्णा दळवी९८२११९६६०५
श्री.सुमित राणे – ८९७६६४२२०४
श्री.आशिष राणे -८८५०११५९२१

error: Content is protected !!