केंद्राच्या 50 लाखाच्या बजेटमधील विकासनिधी आणण्यात विनायक राऊत ठरले कुचकामी
वक्तृत्व दातृत्व कर्तृत्व असणारा असेल महायुतीचा उमेदवार
कणकवली (प्रतिनिधी) : भराडीदेवीचे आशीर्वाद भाजपा नेत्यानी घेत कोकणात आता रोजगाराची दारे उघडू दे, रत्नागिरी सिंधुदुर्गात बंद असलेली घरे पुन्हा उघडू दे, स्थानिकांच्या हाताला रोजगार ह्याच ठिकाणी मिळू दे असे साकडे घातले. जशी मोदी सरकार देशाची भरभराट करतेय तशीच रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात विकासाची मिसिंग लिंक खासदारकी च्या निवडणुकीत भरून निघू दे. महायुती चा उमेदवार भरघोस मतांनी लोकसभा निवडणूक जिंकू दे असे साकडेही घातल्याचे भाजपा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघप्रमुख प्रमोद जठार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी कणकवली तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री बबलू सावंत उपस्थित होते.लोकसभेच्या उमेदवारांची दुसरी यादी 6 मार्च रोजी व त्यांनंतर काही दिवसांत तिसऱ्या यादीत एकूण सर्व उमेदवारांची नावे जाहीर होतील. दुसऱ्या यादीत महाराष्ट्र मधील उमेदवारांची नावे जाहीर होण्याची शक्यता असल्याचे जठार म्हणाले.महायुती च्या उमेदवाराला 3 लाख मतांच्या लीड ने निवडून आणू असा विश्वास जठार यांनी व्यक्त केला. पंतप्रधान मोदी, अमित शाह, फडणवीस यांनी दिलेल्या उमेदवाराला पूर्ण क्षमतेने जिंकून आणणार आहोत. जो कोणी महायुती चा उमेदवार असेल त्याच्यासाठी जनतेतून जाहीरनामा करणार आहोत. रत्नागिरी सिंधुदुर्ग च्या विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार करत आहोत. ही ब्ल्यू प्रिंट आम्ही जनतेसमोर जाहिरनाम्यातून आणणार आहोत असे जठार यांनी सांगितले. कोकणविकासाच्या संकल्पना कार्यकर्त्यांनी या जाहिरनाम्यासाठी सांगाव्यात. पुढील 5 वर्षांत जलजीवन मिशन मधून दिलेला निधी वापरात आणून घराघरात पिण्याचे पाणी पोचवण्यासाठी आम्ही कार्यरत असणाऱ आहोत. एअर पोर्ट सारखी सुंदर रेल्वे स्टेशन , पर्यटनाच्या माध्यमातून सागर किनाऱ्यावरील युवकांना रोजगार देण्याचे वचन या जाहीरनाम्यात असेल.मागील 10 वर्षांत विकासाचा बॅकलॉग भरून काढणारा कार्यक्षम उमेदवार लोकसभा निवडणूकित देणार आहोत. केंद्र आणि राज्य सरकार आणि जनतेतील दुवा असणारा आणि वक्तृत्व दातृत्व आणि कर्तृत्व असणारा उमेदवार महायुती चा असणार आहे. केंद्राच्या 50 लाख कोटी बजेटमधील मोठा वाटा तळकोकणात आणणारा आमचा उमेदवार असेल.विनायक राऊत हे केंद्राचे बजेट मतदारसंघात आणण्यासाठी कुचकामी ठरले अशी टीकाही जठार यांनी केली. 3 लाख कोटी गुंतवणूक असलेला रिफायनरी प्रकल्प आम्ही आणला. त्याला खासदार विनायक राऊत यांनी विरोध केला. अशाच प्रकारे विकासप्रकल्प आणणाऱ्या ताकदीचा उमेदवार महायुती देणार आहे.













