मालवण (प्रतिनिधी) : येथील युवा उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते प्रितम गावडे यांनी मनसे तालुकाध्यक्ष पदाचा काल राजीनामा दिला. दरम्यान उद्योजक तथा युवा नेते सतीश आचरेकर यांच्या पुढाकारातून प्रितम गावडे यांनी अनेक सहकाऱ्यांसह शिवसेना रत्नागिरी सिंधुदुर्ग नेते किरण उर्फ भैयाशेठ सामंत यांची रत्नागिरी येथे भेट घेतली.
यावेळी विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. सामाजिक क्षेत्रात काम करत असताना जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी, विकासकामे यासाठी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी युती सरकारच्या माध्यमातून सहकार्य मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील व सोबत असल्याचा विश्वास किरण सामंत यांनी व्यक्त केला.
प्रितम गावडे हे वर्षभरापूर्वी मनसे पक्षात दाखल झाले होते. मनसे तालुकाध्यक्ष म्हणूनही त्यांनी यशस्वी कारभार केला. सर्वसामान्य जनतेतून कोणीही कुठलीही समस्या घेऊन आला तर ती समस्या आपण प्राधान्याने सोडवली पाहिजे. यासाठी प्रितम गावडे यांचे नेहमीच प्रयत्नशील राहिले. जनतेचे शासन प्रशासन स्तरावरील प्रश्न सोडवताना अधिकाधिक सेवा करण्यासाठी शिवसेना नेते भैयाशेठ सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली सतीश आचरेकर यांच्या सोबतीने कार्यरत राहणार असल्याचे प्रितम गावडे यांनी सांगितले.
किरण सामंत यांना दिवसभर विविध भागातून अनेकजण भेट घेण्यासाठी येत असतात. किरण सामंत ज्या पद्धतीने सर्वांचे ऐकून घेत प्रश्न सोडवतात. सर्वाना न्याय देतात. ते खरोखरच कौतुकास्पद व आदर्शवत असेच आहे. अशा भावना प्रितम गावडे यांनी व्यक्त केल्या.












