फोंडाघाट (प्रतिनिधी) : सह्याद्री पर्वतराजीच्या सानिध्यात, अन् बारमाही वाहणाऱ्या तळीच्या समोरील फोंडाघाटवासियांचे ग्रामदैवत गांगो- माऊली कृपेने श्री गांगो मंदिरात सालाबाद प्रमाणे महाशिवरात्रि उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी विधिवत मंत्रोच्चारात श्रीअभिषेक- पूजा संपन्न झाली. दुपारी महाआरती आणि त्यानंतर शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण, विविध भक्त- भाविकांकडून करण्यात आले. यावेळी आलेल्या रयतेने श्रीफळ अर्पण करून कृपाशीर्वाद घेण्यात आले. गांगोवाडी मित्रमंडळाने रात्री सुस्वर भजन सेवा अर्पण केली. गुरुकृपा दशावतार लोककला नाट्य मंडळ हळवल, यांनी दशावतार नाटक सादर केले.यावेळी गावातील भाविकांनी गर्दी केली होती. गांगो माऊली देवस्थान कमिटीने उपक्रमाला सहकार्य केल्याबद्दल रयतेचे धन्यवाद दिले.












