गोवा सिंधुदुर्ग सीमेवर विजघर येथे अवैध दारुसह 3 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त

पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या नेतृत्वाखाली दोडामार्ग पोलीसांची कारवाई

दोडामार्ग (प्रतिनिधी) : कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या हद्दीवर विजघर येथे अवैध गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणाऱ्या एकावर पोलिसांनी काल ही कारवाई केली. यावेळी वाहन व दारू मिळून एकूण ३ लाख २० हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. अवैध दारू वाहतूक प्रकरणी संशयित गणेश नवनाथ शिंदे (१८), रा. दहेगाव नाका, गुलजारवाडी, ता. नांदगाव, जि. नाशिक याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ कलम ६५ (अ)(ई), ८१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी दिली.

दोन दिवसापूर्वी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर सर्व चेक पोस्ट पाहणी करुन अधिकारी यांना सूचना दिल्या होत्या. काल झालेल्या कारवाईत संशयित गणेश शिंदे मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर कारने बुधवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास गोव्याहून चंदगडच्या दिशेने जात असता विजघर येथील तपासणी नाक्यावर त्याची कार तपासण्याकरिता पोलिसांनी थांबविले.

कारची तपासणी केली असता कारमध्ये प्रत्येकी १६०० रु. किमतीच्या दोन लिटर मापाच्या रॉयल स्टॅग रिझर्व व्हिस्की लेबलच्या १४ बाटल्या, १५०० रुपये किमतीच्या दोन लिटर मापाच्या मेक डॉवेल्स नंबर १ रिझर्व व्हिस्की लेबलच्या ४ बाटल्या, १६५० रुपये किमतीच्या दोन लिटर मापाच्या रॉयल चॅलेंज फायनेस्ट प्रीमियम व्हिस्की लेबलच्या ६ बाटल्या, १४५० रुपये किमतीच्या दोन लिटर मापाच्या इम्पेरियल ब्ल्यू ब्लेंडेड ग्रेन व्हिस्की लेबलच्या १४ बाटल्या, ८०० रुपये किमतीच्या ७५० मिली मापाच्या रॉयल स्टॅग बॅरल सिलेक्ट लेबलच्या १२ बाटल्या, २०० रुपये किमतीच्या ६५० मिली मापाच्या टुबोर्ग बियर लेबलच्या १२ बाटल्या असा मिळून एकूण ७० हजार ६०० रुपयांची गोवा बनावटीची दारू मिळून आली. पोलिसांनी दारू व अडीच लाख रुपये किमतीची कार असा एकूण ३ लाख २० हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी दिली.

error: Content is protected !!