वागदेतील शाळा व अंगणवाडी इमारत चोरांच्या निशाण्यावर
पोलीस उपनिरीक्षक वृषाली बर्गे यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यात कलमठ येथे घरफोड्यांचे सत्र सुरू झाल्यानंतर आता चोरट्यानी आपला मोर्चा वागदे मध्ये वळवला आहे. कलमठ मध्ये दोन दिवस घर फोड्या झाल्याचे निदर्शना झाल्यानंतर आज वागदे आर्यादुर्गा येथील शाळा व अंगणवाडी इमारतचा दरवाजा चोरट्यांनी कडी कोयंडा फोडून इमारतीमध्ये प्रवेश केल्याची बाब निदर्शनास आली. आज शनिवार असल्याने शिक्षक शाळेत आल्यानंतर त्यांच्या ही बाब निदर्शनास आली.
चोरट्यानी शाळेतील कपाटांची लॉक तोडून आतील साहित्य विस्कटून टाकले होते. तर शाळेतील शेगडीचे बर्नल चोरट्याने चोरून नेल्याची बाब समोर आली. याबाबत शाळेच्या मुख्याध्यापकानी तक्रार दाखल केली आहे. तर याच ठिकाणी असलेल्या अंगणवाडी मध्ये देखील चोरी करण्यात आली असून, येथील देखील शेगडी चे बर्नर चोरट्यांनी चोरून नेले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक वृषाली बर्गे, पोलीस हवालदार मनोज गुरव, पोलिस पाटील वागदे सुनिल कदम, सरपंच संदिप सावंत, उपसरपंच शामल गावडे, शिक्षक खेडकर, अंगणवाडी सेविका व ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान या चोरीच्या घटनेच्या तक्रारीनुसार संशयतांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.