ग्रामपंचायत ची सुसज्ज नूतन इमारत बांधकामासह रस्त्यांचे होणार डांबरीकरण
सरपंच अस्मि प्रशांत लाड यांच्या पाठपुराव्याला यश
कणकवली (प्रतिनिधी) : वायंगणी गावच्या विकासात्मक कामांसाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून त्यांचे वायंगणी ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थांच्या वतीने सरपंच अस्मि प्रशांत लाड यांनी आभार मानले आहेत. वायंगणी सरपंच पदी बिनविरोध निवड झाल्यानंतर अस्मि लाड यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची मुंबई येथे तसेच आमदार नितेश राणे यांची कणकवली येथील निवासस्थानी भेट घेऊन गावच्या विकास कामांना निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली होती. ग्रामपंचायत कार्यालयाची जागा अपुरी पडत असल्याने या ग्रामपंचायत कार्यालयाच्या नवीन इमारत बांधकामासाठी निधी मंजूर करण्याची विनंती पालकमंत्र्यांकडे करण्यात आली होती. ही मागणी पालकमंत्र्यांनी तात्काळ मान्य करत जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत या कामासाठी १२ लक्ष रुपये मंजूर करून दिले आहेत. तसेच वायंगणी गावठाण ताम्हणकरवाडी कडे जाणारा रस्ता ग्रा.मा. १७ हा नादुरुस्त झाला असून त्यासाठी देखील १० लक्ष व १५ लक्ष असा निधी मंजूर केला आहे. तसेच वायंगणी संभाजी बाणे घर ते ओहोळ कडे जाणार रस्ता खडीकरण डांबरीकरण करण्यासाठी ३ लक्ष निधी असा एकूण वायंगणी ग्रामपंचायत करिता जिल्हा वार्षिक योजनेच्या जनसुविधा व रस्ते विकास योजने अंतर्गत ४० लक्ष निधी मंजूर केला आहे.