केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांना संघर्ष समितीमार्फत निवेदन
खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन येथे प्लॅटफॉर्म उभा करणे संदर्भात खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन संघर्ष समितीमार्फत खारेपाटण येथे आलेल्या केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांना निवेदन देण्यात आले. कोकण रेल्वे प्रशासनाने चिंचवली या गावी खारेपाटण रोड हे रेल्वे स्टेशन उभारले आहे. हे स्टेशन खारेपाटणसह परिसरातील 30 ते 40 गावांना सोयीचे स्टेशन असून या रेल्वे स्टेशनवर रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्मची उभारणी न केल्यामुळे रेल्वेमध्ये चढण्यास व उतरण्यास वृद्ध लोक, दिव्यांग बांधव, आजारी व्यक्ती, स्त्रिया व बालके यांना खूप त्रास सहन करावा लागतो. प्लॅटफॉर्म नसल्यामुळे या ठिकाणी एखादा अपघात देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन संघर्ष समितीमार्फत खारेपाटण येथे आलेले केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांची यासंदर्भात भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले.
गृहराज्यमंत्री मिश्रा यांनी या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन आपल्या भाषणामध्ये यासंदर्भात संबंधित मंत्र्यांशी बोलून हा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याची ग्वाही दिली. संघर्ष समितीचे सचिव सूर्यकांत भालेकर व सदस्य अनिल खोत यांनी हे निवेदन मंत्री महोदयांना सादर केले.यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस मनोज रावराणे, भाजपा कणकवली तालुका अध्यक्ष संतोष कानडे,माजी जिल्हा परिषद सभापती बाळा जठार, माजी पंचायत समिती सभापती दिलीप तळेकर, खारेपाटण सरपंच प्राची इस्वलकर,शिडवणे सरपंच रवी शेट्ये, कुरंगवणे सरपंच पप्पू ब्रह्मदंडे, पत्रकार संतोष पाटणकर,रवींद्र गुरव आदी मान्यवर उपस्थित होते.