अनिष्ट प्रथा परंपरांची बंधने झुगारत स्त्रियांनी मानसिक गुलामगिरीतून मुक्त व्हावे – सरिता पवार

कणकवली (प्रतिनिधी) : स्त्रीयांचे माणूसपण नाकारणाऱ्या परंपरांना आपण नाकारायला हवं. आपल्या धर्म संस्कृतीनी लादलेली आणि पिढीजात जपलेली, सर्व अनिष्ठ चालिरितीची बंधने झुगारून स्त्रियांनी आपल्या मानसिक गुलामगिरीतून मुक्त व्हावे. आणि आपल्या प्रगतीसाठी एक पाऊल पुढे यावे असे आवाहन कणकवली येथील राष्ट्र सेवा दलाच्या सामाजिक कार्यकर्त्या, कवयित्री सरिता पवार यांनी केले. राजापूर तालुक्यातील जुवाठी येथे विधवा महिलांना सोबत घेऊन पहिल्यांदाच हळदीकुंकू कार्यक्रम करण्यात आला. जुवाठी हायस्कूलचे सहाय्यक शिक्षक अक्षरमित्र बी. के. गोंडाळ व सौ. मालती गोंडाळ यांनी आपली आई कै. सौ. सावित्री केरू गोंडाळ यांच्या स्मरणार्थ जुवाठी ग्रामपंचायत सभागृहात, संपूर्ण गावातील महिलांसाठी सामुहिरित्या हळदीकुंकू व महिलांसाठी प्रबोधनात्मक व्याख्यान आयोजित केले होते. त्यावेळी सरिता पवार यांनी आपले विचार मांडले. पूर्वापार परंपरेने चालत आलेल्या अनेक प्रथा, महिलांसाठी जाचक आहेत.

यामध्ये पतिनिधनानंतर विधवा होणाऱ्या महिलांची समाजात अगदी अत्यंत वाईट पध्दतीने होणारी अवहेलना, त्यांना जगणं नकोशी करणारी असते. त्याच पध्दतीत मासिकपाळीच्या काळात त्यांना आपल्याच हक्काच्या घरातून त्या चार दिवसांत कसे वाळीत टाकले जाते याचे वास्तव दर्शन, या हळदीकुंकू कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या सुमारे २०० महिलांसमोर पवार यांनी मांडले. आणि त्यांच्याशी संवाद साधत, त्यांच्या कडून होकार -नकार घेत त्यांच्या दू: खाना वाट मोकळी करून दिली. त्या पुढे म्हणाल्या. बी. के. गोंडाळ यांनी, विधवा मातांची आजच्या प्रगतीच्या काळात होणारी अवहेलना याबाबतचे कृतीशील प्रबोधनाचे उचललेले पाऊल धाडसी व क्रांतीकारी आहे. यासाठी त्यांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. कारण त्यांनी याबाबत आपल्या वैयक्तिकस्तरावर कृती कार्यक्रमाची आखणी केली. आपल्या मृत्यूपश्चात आपल्या पत्नीच्या अंगावरील दागदागिने काढू नयेत, कुंकू पूसू नये याबाबतचे राजापूर तहसीलदार कार्यालयात पाहिले प्रतिज्ञापत्र लिहून दिले.

त्यानंतर आपल्या ५० व्या वाढदिवसानिमित्त जुवाठी गावातील १५ विधवा मातांचा, साडी चोळी देवून प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार केला. त्यांच्यामध्ये जाणीव जागृती व्हावी यासाठी कणकवली येथील सरिता पवार यांचे प्रबोधनात्मक व्याख्यान ठेवले होते. आणि त्यानंतर आता गावातील सर्व महिलांसोबत, गावातील विधवा महिलांना घेऊन हळदीकुंकू कार्यक्रम घडवून आणला. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन जुवाठी गावातील ज्येष्ठ माता यशोदा यशवंत घेवडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले व सरिता पवार यांचा शाल श्रीफळ देवून सत्कारही त्यांच्याच हस्ते करण्यात आला.

यावेळी उपस्थित महिलांना कुंकवाचा करंडा देण्यात आला. सोबत, प- पाळीचा हे शास्त्रीय दृष्टीकोन देणारे पुस्तक व विटाळ या बाबत प्रबोधन करणारे पत्रक वाटण्यात आले. यावेळी ओणी गोकुळचे डॉ. महेंद्र मोहन, आशाताई गुजर, रिना अलोक गुजर, राजापूर हायस्कूलचे शिक्षक उमेश शिवगण,पूजा सप्रे, सुहासिनी गिरकर, प्राथमिक. शिक्षिका शीतल मणचेकर, माजी सरपंच रिया मयेकर, माजी ग्रामपंचायत सदस्य नेत्रा मयेकर, विद्यमान सदस्य अस्मिता घेवडे, प्राजक्ता मयेकर, सुजाता कांबळे, अंगणवाडी सेविका दीप्ती कोकाटे, ग्रामसंघ प्रमुख अश्विनी सारंग, स्मिता सुर्यवंशी, वैशाली मोहरकर, चंद्रभागा मयेकर यांच्या सह. भरारी,रमाई,निनादेवी,शक्ती,गीताई, सखी,झेप, संघर्ष ,समर्थ,क्रांती,माऊली,श्रीगणेश, एकता,आणि सावित्रीबाई या बचतगट समूहाच्या अध्यक्ष,सचिव, व सदस्या उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक,सूत्रसंचालन बी.के.गोंडाळ यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!