कणकवली (प्रतिनिधी) : मिरज येथून पणजी च्या दिशेने जाणाऱ्या कदंबा बसमधून प्रवास करणाऱ्या सहाय्यक शिक्षक हरिभाऊ घोगरे यांचा बसमध्येच हार्ट अटॅकने मृत्यू झाला. राधानगरी पासून सुमारे २५ किलोमीटर अंतर बसने पार पार करून बस फोंडाघाटच्या दिशेने येत होती. यादरम्यान बसच्या मागील बाजूस बसलेले सावंतवाडी तालुक्यातील सरमळे गावातील सहाय्यक शिक्षक हरिभाऊ रामभाऊ घोगरे हे प्रवास करत होते. प्रवासादरम्यान त्यांची प्रकृती खालावली आणि फोंडाघाट प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचेपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली. बसमधील चालक आयुब सय्यद आणि वाहक मिलिंद शिंदे यांनी प्राथमिक उपचारासाठी बस फोंडाघाट प्राथमिक आरोग्य केंद्रात नेली, असता उपचारापूर्वीच शिक्षक हरिभाऊ रामभाऊ घोगरे यांचे निधन झाल्याचे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी सचिन जंगम यांनी सांगितले. त्यानंतर कणकवली येथील पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली.अखेर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पंचनामा करून बस पणजीसाठी मार्गस्थ करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच घोगरे यांची पत्नी तसेच सावंतवाडी येथून त्यांचे सहकारी यांनी फोंडाघाट प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतली.यावेळी शिक्षणाधिकारी महेश धोत्रे,शोभराज शेरलेकर, महादेव देसाई, संजय सावंत, नारायण नाईक, मनोहर गवस, कमलाकर ठाकूर यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतली. यावेळी मनमिळावू स्वभावाचे घोगरे यांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे अनेकांचे डोळे पाणावले घोगरे यांच्या पाश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.सायंकाळी उशिरा घोगरे यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.