देवगड (प्रतिनिधी) : महावितरणने दाखल केलेला वीज दरवाढ प्रस्ताव पुर्णपणे रद्द करण्यात यावा व राज्यातील वीजदर कमी करून अन्य राज्यांतील दरांच्या तुलनेने स्पर्धात्मक पातळीवर आणण्यात यावा अशी मागणी देवगड तालुका व्यापारी संघ व देवगड तालुका वीजग्राहक संघटनेच्यावतीने निवेदनाद्वारे उपमुख्यमंत्री तथा उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. याबाबतचे निवेदन तहसिलदार स्वाती देसाई व वीज वितरणचे उपकार्यकारी अभियंता एन्.एन्.शेख यांच्याकडे देण्यात आले.
यावेळी व्यापारी संघाचे जिल्हाध्यक्ष प्रसाद पारकर, तालुकाध्यक्ष शैलेश कदम, देवगड तालुका वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष दिनेश पटेल, शामराव पाटील, आनंद कुळकर्णी, लहरीकांत पटेल, द्विगविजय कोळंबकर, सुरेंद्र चव्हाण, निळकंठ पाटील, वैभव करंगुटकर आदी उपस्थित होते.
निवेदनामध्ये असे म्हटले आहे की, महावितरण कंपनीने महाराष्ट— विद्युत नियामक आयोगाकडे दाखल केलेल्या याचिकेमध्ये आगामी दोन वर्षामध्ये 67,644 कोटी रूपये तुटीच्या भरपाईची मागणी केलेली आहे.एकूण दोन वर्षाचा हिशोब करता ही मागणी सरासरी 67 टक्के दरवाढीची आहे.स्थिर व मागणी आकार, वहन आकार व वीज आकार या तिन्ही आकारात वाढीची मागणी असून एकूण परिणामी वाढ सरासरी 2.55 रूपये प्रति युनिट आहे.दरवाढीच्या प्रमाणात इलेक्ट्रीसीटी डयुटीचा अतिरिक्त बोजा ग्राहकांवर पडणार आहे.ही दरवाढ पुर्णपणे रद्द करण्यात यावी व राज्यातील सध्याचेच वीजदर कमी करून देशातील अन्य राज्यांचा तुलनेने स्पर्धात्मक व समपातळीवर आणावेत अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.याबाबतचे निवेदन तहसिलदार व वीज वितरण उपकार्यकारी अभियंता यांच्याकडे देण्यात आले.