मालवण (प्रतिनिधी) : सर्जेकोट जेटी येथे आठ दिवसांपूर्वी झालेल्या वादातून सर्जेकोट येथील हर्षल रवींद्र पराडकर याने संतोष सत्यवान शेलटकर (रा. कोळंब, खालचीवाडी) यांच्यावर चाकूने वार करून गंभीर दुखापत केल्याची घटना १ मे रोजी घडली होती. दरम्यान, या प्रकरणी हर्षल पराडकरला येथील पोलिसांनी गुरुवारी अटक करून मालवण न्यायालयात हजर केले असता, त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. सरकार पक्षातर्फे अॅड. तुषार भणगे यांनी काम पाहिले. संतोष सत्यवान शेलटकर व त्याचा मित्र जगन्नाथ अंकुश सावजी हे सर्जेकोट जेटीवर आले असता, संशयित हर्षल पराडकर याने शेंडीच्या कारणावरून शिवीगाळ करून पॅन्टच्या खिशातील चाकू काढून संतोष शेलटकर यांना दुखापत केली. जखमी शेलटकरांवर ग्रामीण रुग्णलयात उपचार करण्यात आले. त्यांच्या फिर्यादीनुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आज हर्षलला अटक करण्यात आली. पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली हेमंत पेडणेकर तपास करीत आहेत
चाकूने गंभीर हल्लाप्रकरणी आरोपीला पोलीस कोठडी












