गावकोंडीच्या नदीने घेतला मोकळा श्वास
त्रिंबक गावच्या एकजुटीचे सर्वत्र कौतुक: समाजा पुढे नवा आदर्श
आचरा (विवेक परब) : मालवण तालुक्यातील त्रिंबक हे छोटे, टुमदार गाव. गावाच्या तीन बाजूंस हिरवेगार डोंगर. मात्र गावकोंडीची नदी गावाच्या अगदी मध्यातून बारमाही वाहते. पुर्वी याच नदीच्या पाण्यावर दोन्ही काठांवर उन्हाळ्यात हिरवेगार मळे फुलत. भुईमूग, चवळी, कुळीथ, मिरची, वांगी, वायंगणी भात, मोहरीसारखी पिके घेणारे अनेक शेतकरी या गावात होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून गावातील लोकांनी शेती कमी केली आहे. त्यामुळेच लोकांचे नदीकडे जाणे-येणे, नदीवरील वावरही कमी झाला आहे. आता सगळ्या सुखसोई घरातच उपलब्ध असल्याने नदीकडे कोणी फिरकत नाही. याचाच परिणाम म्हणून नदीला आता पुर्वीचे सौंदर्य राहिलेले नाही. नदीच्या दोन्ही काठांवरची झुडुपे आता वाढत वाढत नदीपात्रात पोचली आहेत. अनेक ठिकाणी तर या झुडुपांनी नदीलाच गिळंकृत करून टाकले आहे. मातीचे, वाळुचे ढीग ठिकठिकाणी निर्माण झाल्याने नाइलाजाने नदीला तिचे पात्रही बदलावे लागले आहे. आता पावसाळ्यात पुराचे पाणी नदीपात्रातून न वाहता ते काठांवरच्या भात शेतीत घुसते. त्यामुळे दरवर्षी भातशेतीचे अतोनात नुकसान होते. उन्हाळ्यात ठिकठिकाणी नदी अंतर्धान पावली असल्याने ती आता बारमाही वाहताना दिसत नाही.
मात्र पर्यावरणाविषयी संवेदनशील असलेल्या गावातील काही बुजुर्ग व तरुणांनी एकजुटीने आता या नदीपात्राची साफसफाई सुरु केली आहे. पिकाव, फावडी, कोयती, घमेली घेऊन सारे गावकरी नदीला पुनरुज्जीवित करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. गावातील सर्व घरांतून या सफाई अभियानास फार मोठा प्रतिसाद लाभत आहे. गावातील अनेकांनी स्वेच्छेने आर्थिक मदतही केली असून सफाईच्या कामासाठी पोकलेनचाही वापर करत आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून ही स्वच्छता मोहीम सुरु असून आता गावकोंडीच्या नदीने मोकळा श्वास घेण्यास सुरुवात केली आहे. त्रिंबक गावातील सुजाण नागरिकांच्या पर्यावरण विषयक जाणीवेचे पंचक्रोशीतील अनेकांनी स्वागत केले असून आवश्यक मदत करण्याचीही तयारी दर्शविली आहे. नुकतीच मालवण पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांनी या नदी स्वच्छता मोहीमेस भेट देऊन येथील कामाचे व त्रिंबकवासियांचे कौतुक व अभिनंदन केले आहे. मृत्युशय्येवर पडलेल्या नदीला सामुहिक श्रमदानातून पुनरुज्जीवित करून मोकळा श्वास घ्यायला लावल्याबद्दल अनेकांनी त्रिंबक वासियांचे कौतुक केले आहे.