शिस्तप्रिय, मातृ हृदयी, विद्यार्थी प्रिय शिक्षिका, पवारबाईंचा यथोचित गौरव, आम्हास प्रेरणादायी–मुलामुलींची मानवंदना.
कराड येथील कृष्णा- कोयनेच्या पवित्र संगमावर विशेष सोहळ्यात पुरस्काराचे वितरण.
फोंडाघाट (प्रतिनिधी) : माझ्या सेवा कालांमध्ये कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना, चढ-उताराच्या प्रसंगांना सामोरे जात, शिक्षण,विद्यार्थी- विद्यार्थिनी प्रति समर्पित भावना,कर्तव्य, कला- क्रीडा- सांस्कृतिक-सामाजिक विभागातील विश्वासार्ह वावर, स्वतःविषयी आत्मविश्वास अशा अनेक बाबीमुळे मिळालेला हा पलपब राज्यस्तरीय ” महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्कार ” विनम्रपणे स्वीकारून,तो माझ्या आजवरच्या प्रवासातील सुद्दुदांना समर्पित करते. कौटुंबिक सदस्यांची साथ,मुलांनी दिलेला आत्मविश्वास आणि माझ्या वडिलांचे माझ्यावरील संस्कार यामुळे या पुरस्काराचे महत्त्व मला ऊर्जा देणारे आहे. असे भावपूर्ण उदगार पुरस्कार विजेत्या, फोंडाघाट न्यू इंग्लिश स्कूलच्या शिक्षिका सौ. सायली सुनील पवार यांनी पुरस्कार घेऊन आल्यानंतर काढले.
कराड येथे कृष्णा कोयनेच्या पवित्र संगमा जवळील विशेष सोहळ्या दरम्यान झालेल्या साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर मुळे ( सदस्य राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, माजी राजदूत ), डॉ. सुषमा कुलकर्णी, हनुमंत चांदगुडे यांचे हस्ते,तसेच डॉ. विनायकराव जाधव, रेखा दीक्षित, स्वाती कुराळे, गणपतराव कणसे, राहुल भिलारे, प्रभाकर घाडगे इत्यादी मान्यवरांचे उपस्थितीत हा पुरस्कार वितरित करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सौ.पवार यांच्या समर्पित सृजनशीलतेचे आणि शैक्षणिक कार्याचे कौतुक केले….
पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर शाळेमध्ये विद्यार्थी- विद्यार्थिनींनी सौ. पवार यांच्या शिस्तप्रिय, मातृ हृदयी, आणि सहज सुंदर शिकवण्याची हातोटी याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना, मानवंदना दिली.यामध्ये ‘अंधाराच्या वाटेवरती, प्रकाशाची दिली आशा ‘अशा शब्दात श्रेया कुबडे, हर्षित गांधी, सेजल हुंबे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पलपब पब्लिकेशनचा मानाचा जीवनगौरव पुरस्कार मिळविल्याबद्दल सौ.पवार यांचे पंचक्रोशी तसेच संस्थेचे संचालक, सहकारी शिक्षक वर्ग, कर्मचारी वर्ग तसेच विद्यार्थी- विद्यार्थिनी मधून अभिनंदन आणि कौतुक होत आहे…