मुलांनी शाळा गेल्या गजबजून
सर्व विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तके प्रदान
खारेपाटण (प्रतिनिधी) : राज्यात आज शैशणिक वर्ष सन – २०२४-२५ करीता दि.१५ जून २०२४ रोजी या एकाच दिवशी सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरू झाल्या असून गेले दीड महिना बंद असलेल्या सर्वच शाळा मुलांनी गजबजून गेल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मॉडेल स्कूल म्हणून ओळख असणाऱ्या खारेपाटण येथील जि.प.पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेत नवागत विद्यार्थ्यांचे मोठ्या उस्ताहात व आनंदी वातावरणात शालेय शिक्षकांच्या वतीने औक्षण व आरत ओवाळून स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमाला खारेपाटण जि.प.केंद्र शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्राप्ती कट्टी,शाळेचे माजी अध्यक्ष,शिक्षणतज्ज्ञ व पत्रकार संतोष पाटणकर, केंद्र शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर सर, खारेपाटण ग्रा.पं. सदस्या सौ.अस्तली पवार ,खारेपाटण पोलीस स्टेशन चे बिट अंमलदार उद्धव साबळे,ग्रामसेवक गिरीश धुमाळे, केळवली गावचे पोलीस पाटीलधामापूरकर,अंगणवाडी सेविका मोहिरे मॅडम,शाळा समिती सदस्य निधी शिंदे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
शाळेतील इयत्ता १ ली च्या वर्गात नव्याने दाखल होणाऱ्या शाळेच्या अन्य वर्गात देखील नव्याने दाखल होणाऱ्या सर्व मुलांचे शाळेच्या महिला शिक्षकांच्या वतीने कुकम तिलक लावून मनोभावे स्वागत करण्यात आले.यावेळी सर्व विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ,पेंन,पेंसिल, वह्या व शालेय पाठ्यपुस्तके तसेच गोड पदार्थ मान्यवरांच्या हस्ते मोफत वाटप करण्यात आले. तर खारेपाटण केंद्र शाळेत नव्याने दाखल झालेले पदवीधर शिक्षक मिलिंद सरकटे व शीतल राठोड यांचे देखील शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी शाळेचे माजी अध्यक्ष संतोष पाटणकर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करत शाळेच्या नवीन शैशणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.तर “राज्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची वाढत जाणारी पटसंख्या मराठी भाषा व मराठी माणूस आणि त्या अनुषंगाने निगडित असलेली संस्कृती चिरकाल टिकवून ठेवणे साठी समाजातील सर्वच घटकांचे योगदान अत्यावश्यक असल्याचे भावपूर्ण उदगार संतोष पाटणकर यांनी काढले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या शिक्षिका अलका मोरे,रुपाली पारकर, आरती जेजोन,अबिदा नाईक,शीतल राठोड, मिलिंद राठोड यांनी विशेष प्रयत्न केले.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन खारेपाटण केंद्र शाळेचे उच्च श्रेणि मुख्यद्यापक प्रदीप श्रावणकर सर यांनी केले तर सर्वांचे आभार शाळेच्या शिक्षिका .रेखा लांघी मॅडम यांनी मानले.