वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी रिक्षा ताब्यात : उद्या वेंगुर्ला कोर्टाचे केले जाणार हजर
वेंगुर्ला (प्रतिनिधी) : मातोंड येथील शासकीय वनात भेरले माडाच्या पानांची तोड करून तस्करी केल्याप्रकरणी सावंतवाडी वनविभागाच्या पथकाने तळवडे येथील दोघांना ताब्यात घेतले. ही कारवाई आज दुपारी मातोंड येथील जंगलात करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, सावंतवाडी वन विभागाचे फिरतेपथक वेंगुर्ला येथे कार्यरत असलेल्या मठ परिमंडळ अंतर्गत येणाऱ्या मातोंड वन गट नंबर-246 ची तपासणी करीत असताना दुपारच्या दरम्यान जंगलामध्ये जागोजागी भेडल्यामाड झाडांची तोड करून पाने गोळा केला असल्याचे दिसून आले. या तोडीचा कानोसा घेत आरोपींचा तपास केला असता काही अज्ञात इसम जंगलामध्ये विळ्याच्या सहाय्याने भेडल्या माडाची तोड करुन, पानांचे ढीग बांधत असल्याचे दिसून आले. सदर इसमांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांची नावे बाबल लाडू परब, वय-49 वर्षे व प्रकाश लाडू जाधव, वय-55 वर्षे, दोघेही राहणार तळवडे येथील असल्याचे निष्पन्न झाले. सदर आरोपींची चौकशी केली असता भेरले माडाच्या पानांची तोड ही मुंबई-पुणे येथे विक्रीच्या उद्देशाने पाठवण्यासाठी केली असल्याचे सदर आरोपींनी मान्य केले. आरोपींनी सोबत भेरलेमाड पानांच्या वाहतुकीसाठी आणलेली एक तीनचाकी रिक्षा (MH-07 C 5771), पाळ, कोयता देखील जप्त करण्यात आले.
सदरची कारवाई ही उपवनसंरक्षक सावंतवाडी वन विभाग नवकिशोर रेड्डी, सहाय्यक वनसंरक्षक डॉ.सुनिल लाड यांचे मार्गदर्शनाखाली मदन क्षीरसागर-वनक्षेत्रपाल फिरते पथक, मधुकर काशीद-वनपाल फिरते पथक ,सावळा कांबळे- वनपाल मठ, प्रमोद जगताप -वनरक्षक फिरते पथक, सूर्यकांत सावंत-वनरक्षक मठ, विष्णू नरळे-वनरक्षक तूळस, रिषिका होले वनरक्षक फिरते पथक,संतोष इब्रामपुरकर, शंकर पाडावे वणसेवक यांनी पार पाडली.