कणकवली (प्रतिनिधी) : “विद्यार्थी हा शिक्षण प्रवाहातील महत्त्वाचा घटक आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच करियर जडणघडण महत्वाची आहे. आपल्या आसपास विद्यार्थी या जडणघडणीच्या आकापासून खूप लांब असल्याचे दिसून येते. महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक दृष्ट्या आपला जिल्हा अग्रेसर असूनही प्रशासकीय सेवेमध्ये किंवा शासकीय नोकऱ्यांमध्ये आपल्या भागातील विद्यार्थी सहसा दिसत नाही. याची कारणे शोधण्याचं काम ट्रस्ट करतो आहे. हुशार व मेहनती विद्यार्थ्यांनी आमच्यासारख्या लोकांनी सुरू केलेल्या संस्थांच्या माध्यमातून आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध करावी. आम्ही तुम्हाला व्यासपीठ देतोय” असे प्रतिपादन अध्यक्षपदावरून मार्गदर्शन करताना मूरकर गुरुजी चॅरिटेबल ट्रस्ट कणकवलीच्या शैक्षणिक मंडळामार्फत आयोजित नगर वाचनालयाच्या सभागृहात इयत्ता दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यानिमित प्रा दिवाकर मुरकर यांनी केले. नुकताच नगर वाचनालय कणकवली सभागृहात इयत्ता दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत प्रा. दिवाकर मुरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
यावेळी व्यासपीठावर कणकवली शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव विजयकुमार वळंजु, कणकवली शिक्षण संस्थेचे सचिव डी. एम. नलवडे, कणकवली कॉलेज ,कणकवलीचे प्राचार्य युवराज महालिंगे , विद्या मंदिर प्रशाला कणकवलीचे मुख्याध्यापक डॉ. पी. जे. कांबळे, शिक्षण मंडळाचे चेअरमन प्रा. अच्युतराव वणवे,ट्रस्टचे ज्येष्ठ सदस्य पारकर गुरुजी उपस्थित होते.दीप प्रज्वलन व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मुरकर गुरुजी व भालचंद्र महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. समारंभाचे अध्यक्ष प्रा. दिवाकर मुरकर यांनी पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत केले.
मुरकर गुरुजी चॅरिटेबल ट्रस्ट च्या शिक्षण मंडळाचे चेअरमन प्रा. अच्युतराव वणवे यानी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. व्यासपीठावरील मान्यवरांनी उपस्थित विद्यार्थी व पालकांना यथोचित मार्गदर्शन केले. महाराष्ट्रातील शिक्षण परंपरेविषयी रयत शिक्षण संस्थेचे दाखले देत, “कर्मवीर भाऊरावांसारख्या एका महान व्यक्तीने शैक्षणिक परंपरा खूप बळकट केली.” असे डॉ. पी. जे. कांबळे म्हणाले. “विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी संस्था नेहमीच पुढाकार घेतच असतात. मात्र विद्यार्थी व पालकांनी आपणास जे हवे आहे ते मिळवण्यासाठी प्रयत्न करणेही गरजेचे आहे.” असे मार्गदर्शन प्राचार्य युवराज महालिंगे यांनी केले. “या जिल्ह्यात कणकवलीला शिक्षण क्षेत्राबाबत एक वेगळी परंपरा आहे. मुलांनी आधी संस्कारांची शिदोरी गाठीशी बांधून शिक्षणाकडे वळावे. एकदा घेतलेले व्रत पुढे नेतांना आई-वडिलांच्या अपेक्षा पूर्तींकडे लक्ष ठेवून कार्यरत राहणे हे विद्यार्थ्यांचे कर्तव्य आहे.” असे प्रतिपादन विजयकुमार वळंजु यांनी केले. “शिक्षण क्षेत्रातील प्रवास हा एक सुकर प्रवास मानून विद्यार्थ्याने मार्गक्रमण केल्यास यश लांब नसते. मात्र याला कष्ट व प्रामाणिकपणाची जोड असावी.” असे मार्गदर्शन डी.एम नलावडे यांनी केले.
तद्नंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,पुणे यांच्यामार्फत मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी व इयत्ता बारावी परीक्षा मध्ये यश संपादन केलेल्या कणकवली व परिसरातील विद्यालय आणि महाविद्यालयांमधून आलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन गुणगौरव करण्यात आला.
गुणगौरव कार्यक्रमासाठी परिसरातील विद्यालय व महाविद्यालयातून मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.मोहन कुंभार यांनी केले. तर उपस्थित मान्यवर व विद्यार्थ्यांचे प्रा. विजय सावंत यानी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य प्रा. राणे एन.जे. शिक्षिका व मंडळाच्या सदस्या शिरसाट मॅडम. राजाभाऊ मुंडे, सुभाष नलवडे, गोवेकर, पेडणेकर, खटावकर यांचे विशेष सहाय्य लाभले.