शैक्षणिक व पर्यावरणीय कामगिरीबद्दल होणार गौरव
तळेरे (प्रतिनिधी) : अविष्कार सोशियल अँड एज्युकेशनल फाउंडेशन कोल्हापूरच्यावतीने देण्यात येणारा यावर्षीचा “लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्कार” सोनुर्ली, ता. सावंतवाडी येथील माऊली माध्यमिक विद्यालय सोनुर्ली या प्रशालेचे सहाय्यक शिक्षक प्रदीप मारुती सावंत यांना जाहीर झाला आहे. फाऊंडेशनच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना प्रतिवर्षी पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. प्रदीप सावंत हे गेली 26 वर्षे सोनुर्ली विद्यालयात इंग्रजी विषयाचे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण या क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेली असून ते, सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर सहकारी पतपेढीच्या संचालक पदी काम पाहतात. तसेच नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था भारत या संस्थेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी कार्यरत आहेत. प्रदीप सावंत यांचे शालेय शिक्षण कणकवली तालुक्यातील शिवडाव गावात झाले असून या यशाबद्दल सावंत सरांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. या पुरस्काराचे वितरण रविवार 30 जून रोजी कोल्हापूर येथील राजर्षी शाहू स्मारक सभागृहात होणार आहे.