तिलारी खोऱ्यात हत्तींकडून नुकसान सुरूच; शेतकरी त्रस्त

हत्तींना आवरा किंवा शूट करण्याचा परवाना द्या; हत्ती हटावसाठी एक महिन्याची डेडलाईन

दोडामार्ग (प्रतिनिधी) : तिलारी खोऱ्यातील बहुतांशी गावात हत्तींकडून शेती बागायतीचे अतोनात नुकसानीचे सत्र सुरुच आहे. शासनाची हत्ती हटाव मोहीम पूर्णपणे निष्फळ ठरली आहे. तुटपुंजी भरपाई व किचकट निकषांमुळे शेतकरी त्रस्त आहेत. आम्हांला भरपाई नको. हत्तींचा तातडीने बंदोबस्त करा किंवा शेतकऱ्यांना बंदूक परवाना देऊन हत्तींना शूट करण्याची परवानगी द्या, अशी उद्विग्न मागणी दोडामार्गमधील नुकसानग्रस्त गावातील सरपंच व लोकप्रतिनिधींनी सरकारकडे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली. ३१ मार्च पर्यंत ठोस कार्यवाही न केल्यास वनविभागाच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रेमानंद देसाई यांनी दिला.

दोडामार्ग येथील स्नेह रेसिडन्सीमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. तिलारी खोऱ्यातील सरपंच व लोकप्रतिनिधींकडून आक्रमक भूमिका मांडण्यात आली. यावेळी सरपंच सेवा संघ जिल्हाध्यक्ष प्रेमानंद देसाई, मोर्ले माजी सरपंच गोपाळ गवस, मोर्ले सरपंच संजना धुमास्कर, उपसरपंच संतोष मोर्ये, हेवाळे सरपंच साक्षी देसाई, उपसरपंच समिर देसाई, घोटगेवाडी उपसरपंच सागर कर्पे, माजी सरपंच प्रेमनाथ गवस, मांगेली उपसरपंच कृष्णा गवस उपस्थित होते.

प्रेमानंद देसाई यांनी आक्रमक भूमिका मांडली. ते म्हणाले, दोडामार्गमधील तिलारी खोऱ्यात गेली २२ वर्षे रानटी हत्तींचा उपद्रव सुरु आहे. शेती, बागायतीचे अपरिमित नुकसान करण्यात येते. हत्तींना कर्नाटकात हुसकावून लावण्यासाठी शासनाने केलेल्या सर्व उपाययोजना कुचकामी ठरल्या आहेत. सध्या काजू बागायतीमध्ये काजू गोळा करण्यासाठी जाही धोकादायक बनते आहे. नुकसानीपेक्षा मिळणारी भरपाई खूपच तुटपुंजी आहे. आम्हांला भरपाई नको. हत्तीचा कायमचा बंदोबस्त करा किंवा शेतकऱ्यांना बंदूक परवाना देऊन हत्तींना शूट करण्याची परवानगी सरकारने द्यावी अशी आक्रमक भूमिका मांडली.

गोपाळ गवस म्हणाले, शासनाने उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या खासगी अभयारण्यासाठी शासन प्रक्रियेनुसार ७ हत्ती दिले. त्याचप्रमाणे तिलारी खोऱ्यातील हत्तींचा निर्णय घ्यावा. गावात लोकवस्ती पर्यंत हत्ती येतात. जीव धोक्यात घालून स्थानिक ग्रामस्थ त्यांना हुसकावून लावतात. वनविभागाचे कर्मचारी केवळ बघ्याची भूमिका घेतात. हत्ती हटावसाठी आतापर्यंत करोडो रुपयांचा चुराडा करण्यात आला. मात्र त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. बागायती उभी करण्यासाठी बरीच अंगमेहनत करावी लागते. मात्र हत्ती क्षणार्धात होत्याचे नव्हते करतात. हत्ती हटावसाठी शासनाने ठोस भूमिका न घेतल्यास स्थानिकांमधून तीव्र पडसाद उमटतील असा इशारा दिला.

यावेळी संतोष मोर्ये, साक्षी देसाई, प्रेमनाथ कदम यांनीही आक्रमक भूमिका मांडली. हत्ती हटावसाठी स्थानिक शेतकरी आरपारची लढाई करण्याच्या पावित्र्यात असल्याचा सूर उपस्थित लोकप्रतिनिधींकडून उमटला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!