कोष्टी समाजाचे कणकवली शहर विकासात नेहमीच भरीव योगदान – समीर नलावडे

नाविन्यपूर्ण रिंग रोडचे काम सुरू

चौंडेश्वरी मंदिरालगतचे गणेश मंदिर हटवीले

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहराच्या विकासात महत्त्वपूर्ण टप्पा ठरणाऱ्या रिंगरोड च्या फेज वन चे काम यापूर्वी सुरू केलेले होते. परंतु यातील महत्वाचा टप्पा असलेल्या चौंडेश्वरी मंदिरा नजिकचे बाधित होणारे गणपती मंदिर आज पाडण्याचे काम हाती घेण्यात आले. गेली अनेक वर्ष हा रिंगरोड दृष्टीपथात असताना काही अडचणींमुळे हे काम मार्गी लागत नव्हते. मात्र लक्ष्मी चित्रमंदिर ते मसूरकर किनई मार्गे गांगो मंदिर इथपर्यंतचे काम दोन वर्षांपूर्वी पूर्ण झाले. त्यानंतर टेबवाडी ते रवळनाथ मंदिर या फेज वन टप्प्याचे काम काही अंशी सुरू करण्यात आले होते. यामध्ये गणपती साना रोड ते रवळनाथ मंदिर पर्यंतच्या रस्त्याची आखणी करून खडीकरण व साईटच्या संरक्षण भिंत चे काम करण्यात आले. त्यानंतर आज टेंबवाडी ते चौंडेश्वरी मंदिरापर्यंतच्या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. कणकवली शहरवासीयांनी या रस्त्या करिता आपली जमीन, घरे, मंदिर, विहिरी आधी बाधित होणाऱ्या मालमत्ता देऊन शहराच्या विकासात मोठे योगदान दिल्याबद्दल या सर्वांचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांनी आभार व्यक्त केले.

या रिंग रोडवर फूटपाथ सह, मॉर्निंग वॉकला येणाऱ्या व ज्येष्ठांना थांबण्याकरिता बैठक व्यवस्था व एलईडी स्क्रीन ची देखील अनोखी संकल्पना मांडण्यात आली असून, फेज दोन व तीन चे सुद्धा काम लवकरच मार्गी लावले जाईल अशी माहिती श्री. नलावडे व श्री. हर्णे यांनी दिली. व खऱ्या अर्थाने कणकवली वासीयांना दिलेला शब्द पूर्ण करू अशी ग्वाही देखील नगराध्यक्ष श्री. नलावडे व उपनगराध्यक्ष हर्णे यांनी दिली. कणकवली चौंडेश्वरी मंदिरा नजीक असलेले गणपती मंदिर, किचन शेड, ब्राह्मण निवासस्थान, गार्डन, विहीर हे रस्त्यात बाधित होणाऱ्या बांधकामाचे पाडकाम आज सकाळपासून हाती घेण्यात आले. या रस्त्याच्या कामाची पाहणी केल्यानंतर बोलताना नगराध्यक्ष समीर नलावडे म्हणाले, प्रगत कणकवली जर आपल्याला बघायची असेल तर शहरातील रस्ते हे प्रामुख्याने झाले पाहिजेत. 2018 मध्ये सत्तेत आल्यावर कणकवली शहरातील डीपी रस्ते विकसित करण्याचे ध्येय करून आम्ही काम हाती घेतले. यात पहिले काम म्हणजे लक्ष्मी चित्रमंदिर ते गंगो मंदिर पर्यंतचा रस्ता विकसित केला. त्यापूर्वी देखील शहरातील अनेक डीपी रस्ते विकसित केले. मात्र रिंग रोड करण्याचे स्वप्न बाळगूनच आम्ही वाटचाल सुरू केली. फेज वन मधील 12 मीटर रुंदीचा हा नवीन केला जाणारा रस्ता लवकरच शहरवासीयांच्या सेवेत येईल असा विश्वास नगराध्यक्ष श्री. नलावडे यांनी व्यक्त केला. शहरातील रस्त्यांना साधा आपला काही फुटाच्या जमिनीचा कोन देखील काही जण देऊ पाहत नाहीत. मात्र कोष्टी समाजाचे या निमित्ताने मी आभार व्यक्त करेन. कारण त्यानी चौंडेश्वरी मंदिरा नजीक असलेले संपूर्ण गणपती मंदिर काढण्यास तसेच या ठिकाणी बारमाही पाणी असलेली विहीर देखील बुजवण्यासाठी आम्हाला सहकार्य केले. कोष्टी समाजाने ज्या पद्धतीने या कामासाठी आपले योगदान दिले असे योगदान कणकवली शहरातील जनतेने द्यावे, असे आवाहन देखील श्री नलावडे यांनी केले.

विकास प्रक्रियेत कोणतीही कारणे खपवून घेतली जात नाहीत. आम्ही विकासाला प्राधान्य देत असताना निवडणुकीत शहरवासीयांना दिलेला शब्द पूर्ण करण्याचे देखील काम सुरू केले आहे. या रिंग रोडच्या फेज टू च्या कामाला देखील आम्ही लवकरच सुरुवात करणार असून, रवळनाथ मंदिर ते सुतारवाडी पर्यंत हा रस्ता केला जाणार आहे. तसेच फेज थ्री चा सुद्धा आराखडा तयार करण्यात आला असून, हे देखील काम लवकरच हाती घेतले जाईल. फेज थ्री पर्यंत चे काम पूर्ण झाल्यावर या डीपी रस्त्याने थेट रेल्वे स्टेशनला जाण्याचा मार्ग उपलब्ध होणार आहे. अशी माहिती श्री. नलावडे यांनी दिली.

यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे म्हणाले, कणकवली शहरातील ग्रामीण भाग हा शहरी भागाच्या अजून जवळ यावा व यातून कणकवली शहरातील ग्रामीण भागाचा देखील विकास झपाट्याने व्हावा याकरिता प्रामुख्याने हा रिंग रोडचा महत्वकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. हा रस्ता 12 मीटर रुंदीचा होणार असून,रस्त्याच्या दोन्ही बाजूला दीड मीटर रुंदीचे गटार व त्यावर फुटपाथ केला जाणार आहे तसेच या रस्त्याच्या बाजूला ओपन एलईडी स्क्रीन देखील लावल्या जाणार आहेत जेणेकरून या स्क्रीनच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती तसेच जाहिरातीच्या माध्यमातून नगरपंचायत च्या उत्पन्न वाढीसाठी नवीन संकल्पना तयार करण्यात आली आहे. तसेच या रस्त्यावरून मॉर्निंग वॉक किंवा इव्हनिंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांना ज्येष्ठांना थांबण्याकरिता विश्रांती घेण्यासाठी करण्याकरता बैठक व्यवस्था देखील केली जाणार आहे. विकास प्रक्रिया राबवत असताना अशा प्रकारे मंदिर हटविण्यासाठी सुद्धा चौंडेश्वरी मंदिर समितीच्या माध्यमातून सकारात्मक भूमिका घेत शहराच्या विकास प्रक्रियेत आपले योगदान देत हात पुढे केला गेला. याच सोबत अन्य बाधित होत असलेल्या जमीन मालक, इमारत मालकांनी देखील दिलेले योगदान हे शहराच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारे आहे. या रस्त्यालगतच आता काही दिवसात गणपती साना येथे धबधब्याचे काम केले जाणार आहे. जेणेकरून भविष्यात कणकवली शहरातील पर्यटन दृष्ट्या देखील हा रस्ता व येथे मिळणाऱ्या सुविधा या शहरवासीयांना फायदेशीर ठरणार आहेत. जुना नरडवे रस्ता ते सुतारवाडी पर्यंतच्या रिंग रोड च्या टप्प्याचे काम देखील लवकरच सुरू होईल. या ठिकाणचा हा रस्ता 18 मीटर रुंदीचा होणार असून, दोन्ही बाजूला गटार व फुटपाथची व्यवस्था व रस्त्याच्या मधील भागात डिव्हायडर व त्यावर विद्युत पोल असा चार पदरी रस्ता या ठिकाणी केला जाणार आहे. आता हाती घेतलेल्या रिंग रोडचे काम हे सुमारे 600 मीटरचे असून, एकूण रिंग रोड हा सुमारे 4 किलोमीटरचा आहे अशी माहिती श्री हर्णे यांनी दिली.

यावेळी बोलताना चौंडेश्वरी मंदिर समितीचे सेक्रेटरी अनंत हजारे म्हणाले, विकासाच्या आड यायचं नाही अशी भूमिका घेऊन आमच्या संस्थेने या रस्त्या करिता गणपती मंदिर, विहीर, किचन हॉल, ब्राह्मण निवासस्थान, गार्डन सह जमीन व इमारती बाधित होऊन देखील त्या रस्त्याच्या विकासाकरिता देण्याची तयारी दर्शवली. व यातून आमचे नुकसानही होऊ नये अशी भूमिका आम्ही घेतली. त्यानुसार नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी मंदिर समितीचे नुकसान होऊ न देता योग्य प्रकारे शासकीय मोबदला मिळवून देण्याचे आश्वासन दिले अशी माहिती श्री. हजारे यांनी दिली. जे गणपती मंदिर या रस्त्यामध्ये बाधित झाले तसेच गणपती मंदिर नव्याने या ठिकाणी बांधण्याचे आम्ही नियोजन केले असल्याचेही हजारे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!