संत रोहिदास सेवाभावी संस्थेचा राज्यस्तरीय चतुर्थ वर्धापनदिन धुमधडाक्यात संपन्न
राज्यस्तरीय संत रोहिदास सन्मान पुस्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले प्रदान
कणकवली (प्रतिनिधी) : इमान आमच्या मातीशी..माणुसकीच्या नात्याशी हे ब्रीदवाक्य असणारी संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्था महाराष्ट्र मुंबई ही राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असणारी समाज संघटना आहे. संघटनेच्या माध्यमातून चर्मकार समाजातील ज्ञातीबांधवांचे हित जपले जाते.नैसर्गिक आपत्ती असो अथवा कुठलेही संकट असो आमची संघटना नेहमीच समाजाच्या पाठीशी उभी असते. आपापल्या क्षेत्रात आपल्या कार्यक्तर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या समाजबांधव भगिनींचा आज राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान करत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली जात आहे. सिंधुदुर्गात साकारत असलेल्या चर्मकार समाज भवन साठीही आमची संस्था यथाशक्ती आर्थिक सहकार्य करणार आहे. चर्मकार समाजाच्या समस्यांसंदर्भात आमची संस्था केवळ राज्यस्तर नव्हे तर राष्ट्रीयस्तरावर कार्यरत आहे असे प्रतिपादन संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय उर्फ छोटू कदम यांनी केले.संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्था महाराष्ट मुंबई चा राज्यस्तरीय चौथा वर्धापनदिन आणि संत रोहिदास जयंती व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा कणकवली येथे मराठा मंडळ सभागृहात रविवार 5 मार्च रोजी संपन्न झाला. याप्रसंगी कदम बोलत होते. उद्योजक संजय चव्हाण यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.तर संस्थाध्यक्ष संजय कदम , उद्योजक गणेश जाधव यांच्या हस्ते संत रोहिदास, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर संस्था राज्यसरचिटणीस प्रसाद मसुरकर, राज्य उपाध्यक्ष पंढरी जाधव, राज्य खजिनदार रवींद्र पावसकर, ओंकार बर्ड प्रुफिंग प्रायव्हेट लिमिटेड चे संस्थापक युवा उद्योजक संजय चव्हाण, राधानगरी पं स चे माजी उपसभापती रविश पाटील, सावली फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष गणेश जाधव, मुंबईतील गुंतवणूक सल्लागार अनिल चव्हाण, भागीरथी प्रतिष्ठान कबे अध्यक्ष दिनेश भोईर, सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुजित जाधव, दै.रत्नागिरी टाइम्स चे आवृत्तीप्रमुख लक्ष्मीकांत भावे, संस्था जिल्हाध्यक्ष प्रदीप बांबार्डेकर, कार्याध्यक्ष दत्ताकुमार फोंडेकर, कोकण विभाग अध्यक्ष भिकाजी नेरकर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना युवा उद्योजक संजय चव्हाण म्हणाले की समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करणे ही संकल्पना समाज एकजुटीसाठी प्रभावी ठरणारी आहे. संत रोहिदास सेवाभावी संस्थेचे कार्य केवळ मुंबई आणि कोकण पुरते मर्यादित न राहता आता राज्यभर पसरत आहे.संघटना विस्तारत असतानाच समाजातील घटकांवर अन्याय झाल्यास त्याला न्याय मिळवून देण्यासाठीही संस्था आघाडीवर असते.यावेळी मनोगत व्यक्त करताना सावली फाउंडेशन चे अध्यक्ष गणेश जाधव यांनी संस्थेच्या कार्याचा विशेष गौरव केला.केवळ कागदोपत्री संघटना स्थापन न करता खऱ्या अर्थाने समाजातील अंतिम घटकापर्यंत आज संत रोहिदास सेवाभावी संस्था पोचली असल्याचे जाधव यांनी नमूद केले. संस्थेच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीसाठी प्रभात दत्ताकुमार फोंडेकर यांना संत रोहिदास शिक्षणरत्न पुरस्कार, एमपीएससी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून जलसंपदा विभागात सहाय्यक अभियंतापदी रुजू झालेले इंजिनिअर स्वप्नील होडावडेकर याना शिक्षणरत्न पुरस्कार,500 हुन अधिक बचतगटांच्या माध्यमातून महिला आर्थिक सबलीकरणासाठी मेहनत घेणाऱ्या इचलकरंजी येथील सामाजिक कार्यकर्त्या रजनी मुरलीधर शिंदे यांना सामाजिक कार्यकर्त्या पुरस्कार, महाराष्ट्र राज्यात आपल्या साहित्यलेखनातून वेगळा ठसा उमटविणाऱ्या फणसवाडी येथील कवयित्री सरिता पवार यांना रोहिदास साहित्यरत्न पुरस्कार, उद्योजक संजय चव्हाण यांना सहकार क्षेत्रातील संत रोहिदास सहकार रत्न पुरस्कार, ओरोस येथील युवा व्यावसायीक तुषार चव्हाण यांना संत रोहिदास सहकाररत्न, तेंडोली येथील दशावतार कलाकार प्रशांत तेंडोलकर याना संत रोहिदास सांस्कृतिकरत्न पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल श्रीफळ स्वरूपात प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यावेळी चर्मकार समाजातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य , उपसरपंच, सरपंच तसेच गुणवंत विद्यार्थी आणि चर्मकला जोपासत आपला उदरनिर्वाह करणाऱ्या ज्ञातीबांधवांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सांगली येथील डॉ रवींद्र श्रावस्ती यांनी संत रविदास यांचे विज्ञानसापेक्ष व्यक्तिचित्र आणि संत रविदास यांच्यावरील कपोलकल्पित भाकडकथा याद्वारे संत रविदास यांचे जीवनचरित्र उपस्थितांसमोर व्यखानातून उलगडून दाखवले. यावेळी सुजित जाधव, अनिल चव्हाण, भिकाजी नेरकर, पत्रकार लक्ष्मीकांत भावे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप मसुरकर यांनी केले. सूत्रसंचालन विठ्ठल चव्हाण यांनी केले तर आभार दत्ताकुमार फोंडेकर यांनी मानले.