शेतकऱ्यांची नुकतीच केलेली लावणी वाहून गेल्याने दुबार लावणीच्या शक्यतेने शेतकरी चिंतित !
पावसाच्या पहिल्याच आठवड्यात सार्व. बांधकाम खात्याचे तीन तेरा– निकृष्ट कामामुळे खड्डे डोकावू लागले.
फोंडाघाट (प्रतिनिधी) : गेल्या रात्रीपासून फोंडाघाट आणि सह्याद्री घाट परिसरात कोसळणाऱ्या अतिवृष्टीमुळे उगवाई नदीला पूर आला असून, अशीच स्थिती रात्रभर राहिल्यास लगतच्या ग्रामस्थांच्या घरात पाणी शिरण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी नुकतीच गेल्या सहा- सात दिवसात केलेली भात लावणी पूर्ण पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे दुबार लावणीचे संकट आणि लावणी कुजण्याची शक्यता, आहे यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. याची कृषी विभाग आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी नोंद घ्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे .
संततदार पावसामुळे उगवाई नदीतील पाणी लगतच्या शेतामध्ये गेले आहे. उगवाई नदी, हातोड्याचा व्हाल, एसटी स्टँड जवळील वहाळ, नाले, फोंडेकर वाडीतील वहाळ दुथडी भरून वाहत आहेत. चेक पोस्ट जवळील रस्त्यावर पाणी आल्याने वाहन चालकांना सावध वाहने चालवावी लागत आहेत . कुळाची वाडी येथे खोदलेल्या कॅनॉलची माती पाण्यासह लगतच्या शेतामध्ये घुसून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. तर शेतामध्ये पाणीच पाणी झाल्याने आणि लावणी पाण्याखाली गेल्याने तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे .
आठवडाभराच्या पावसातच सार्वजनिक बांधकामाच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे खात्याचे पितळ उघडे पडले असून, घाट मार्गावरील संरक्षक भिंती, दत्त मंदिराकडे जाताना नुकताच बांधलेला पूल, हायस्कूल रोडवरील पूल आणि लगतची संरक्षक भिंत, बाजारपेठेतील रस्ता रुंदीकरण च्या नावाखाली निकृष्ट गटारे, गटारा ऐवजी रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्याची नदी, हवेलीनगर मधील निकृष्ट आणि बेपर्वाई ने केलेली गटार कामें यामुळे फोंडाघाटच्या विकासातील “शुक्राचार्यांची कर्तबगारी” लोकांसमोर उघड झाली आहे.गेल्या वर्षी केलेल्या बाजारपेठेतील रस्त्यावरील खड्डे ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या संगनमताचे टाहो ss फोडत खड्ड्याची तोंडे उघडून दाखवीत आहेत. याकडे स्थानिक नेते, ग्रामपंचायत, कर्तव्यदक्ष अधीक्षकांनी गांभीर्याने लक्ष देऊन दोषीवर कारवाई करावी. आणि येणाऱ्या गणेश चतुर्थी सणापूर्वी यावर उपाययोजना करावी, अशी आग्रही मागणी जोर धरू लागली आहे ….
संततधार पावसामुळे आधीच कारण शोधणाऱ्या फोंडाघाट मधील वीज कार्यालयाकडून गेले दोन-तीन दिवस लाईट खंडित होण्याचा प्रकार वाढल्याने, त्याचा व्यापार उदीमावर परिणाम झाला आहे. ग्रामस्थ यांचे कडून प्रचंड असंतोष व्यक्त होत असून, त्याचा विस्फोट होण्याआधी सुधारणा करावी अशी आग्रही मागणी होत आहे—-












