कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील नवविवाहित महिला स्वरानी सचिन नेरकर (वय 35 रा.तेली आळी, कणकवली) हिचा मृतदेह गडनदीपात्रात मराठा मंडळ नजीक गोपुरी बंधारा येथे आज सायंकाळी 4 वाजता आढळला. स्वरानी ही आज सकाळी 11 वाजता कचेरीत जाते असे सासू ला सांगून घरातून बाहेर पडली होती. स्वरानी ने घरातून बाहेर पडताना नऊवारी साडी परिधान केली होती. स्वरानी हिचे पती सचिन हे कणकवली नगरपंचायत मध्ये कनिष्ठ अभियंता पदी कार्यरत आहेत. स्वरानी आणि सचिन यांचा मागील 3 वर्षांपूर्वी विवाह झाला होता. आज दुपारी दोन वाजता सचिन घरी गेले असता घराला कुलूप दिसले. त्यांनी आईला फोन केला असता आईने आपण दवाखान्यात गेले असून स्वरानी ही कचेरीत जाते असे सांगून गेल्याचे सांगितले. सचिन यांनी लागलीच कचेरीत जाऊन स्वरानी आढळून आली नाही. सचिन यांनी तात्काळ स्वरानी च्या माहेरी जाऊन चौकशी केली असता तिथेही ती गेली नसल्याचे समजले. त्यानंतर त्यांना आपली पत्नी स्वरानी हिचा मृतदेह गडनदी पात्रात आढळला असल्याचे समजले. दरम्यान घटनास्थळी कणकवली पोलिसांनी धाव घेत मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात आणला. याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद दाखल करण्यात आली आहे.
कणकवलीत नवविवाहितेचा मृत्यू ; मृतदेह आढळला गडनदीपत्रात












