नविन बोटी व इतर साहित्य वाहून गेल्याने सुमारे ३८ लाखांचे नुकसान झाल्याचे उघड
चौके ( प्रतिनिधी ) : सोमवार दिनांक ८ जुलै आणि मंगळवार ९ जुलै असे दोन दिवस कर्ली नदिला आलेल्या महापुराचा काळसे बागवाडीला मोठा फटका बसून स्थानिक रहिवासी व शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. रात्रौ अडीच वाजता अचानक पाणी पातळी वाढून पूर आल्यामुळे अनेकांना स्वतःचे सामान सुरक्षित ठिकाणी हलवणेही शक्य झाले नाही. यामध्ये बागवाडी येथे कर्ली नदीकिनारी असलेल्या उल्हास उर्फ पिंट्या नार्वेकर आणि कुटुंबीय यांच्या ” बाळराजे फायबर आणि बोट बिल्डर ” या बोटबांधणी कारखान्याचे पुरामुळे सुमारे ३८ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती नार्वेकर यांनी दिली आहे. दोन दिवसांनी पूर ओसरल्यानंतर नार्वेकर यांनी नुकसानीची पाहणी केली असता अंदाजे १४ लाख रुपये किंमतीच्या विक्रीसाठी बनवलेल्या वाळू व्यवसायासाठी वापरण्यात येणाऱ्या लोखंडी पत्र्याच्या दोन नवीन बोटी वाहून बुडाल्याचे निदर्शनास आले त्याबरोबरच १२ लाख ५० हजार रुपये किंमतीचे मॅट , रेक्झीन इत्यादी फायबर सामान भिजून खराब झाले , १ लाख ४० हजार रुपये किंमतीचे वापरातील जनरेटर , मशीनरी, कटर , ग्राईंडर खराब झाले आहे , ७ लाख ६० हजार किंमतीचे लाकडी फळ्या आणि दोर वाहून गेले , १ लाख ३५ हजार किंमतीचे ९ मोठे नांगर व त्याला बांधलेले दोर नदीच्या तीव्र प्रवाहामुळे वाहून गेले. आणि ९० हजार रुपये किंमतीचे वेल्डींगसाठी वापरण्यात येणारे ऑक्सिजन आणि गॅस सिलेंडरही वाहून गेल्यामुळे नुकसान झाले आहे. अशाप्रकारे अचानक आलेल्या पुरामुळे कारखान्याच्या आवारात असलेले छोटेमोठे सामान वाहून गेल्यामुळे सुमारे ३७ लाख ७५ हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती बाळराजे फायबर आणि बोट बिल्डर्स चे मालक पिंट्या नार्वेकर यांनी दिली.