आचरा (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील गवाणे येथील युवा चित्रकार म्हणून सर्वत्र नावारूपाला आलेला अक्षय मेस्त्री याने आषाढी एकादशीचे औचित्य साधून तांदळाच्या दाण्यावरती विठूरायाचे सावळे रूप साकारले आहे. त्यांच्या या सुंदर कलाकृतीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. युवा चित्रकार अक्षय मेस्त्री हा गवाणे सारख्या अतिशय ग्रामीण भागात राहून नेहमीच आपली कला जोपासत असतो. चित्रकलेच्या माध्यमातून अनेक सामाजिक विषय देखील मांडण्याचा त्याचा प्रयत्न असतो. दरवर्षी आषाढी एकादशीला विठ्ठलाची रुपे तो वेगवेगळ्या स्वरूपात समाजात मांडून आपले वेगळेपण जपत आला आहे. यापूर्वी देखील त्याने तुळशीच्या पानावरती तसेच मातीच्या विटेवरती देखील विठ्ठलाची विविध रुपे साकारली आहेत.
अतिशय प्रतिकुल परिस्थितीचा सामना करीत त्याने चित्रकलेचा छंद जोपासला आहे. त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांना चित्रकलेचे धडे देऊन त्यांच्यात चित्रकले विषयीची आवड निर्माण करीत असतो. आपल्या अतिशय सुबक कलाकृतीतून असंख्य शाळांच्या भिंती बोलक्या केल्या आहेत. त्यामुळे एक प्रतिभावंत कलाकार म्हणून अक्षय मेस्त्री याला जिल्हात तसेच संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जाते. असंख्य विषय तो सातत्याने समाजासमोर मांडत असतो. तो नुसताच चित्रकार नसून तो एक सर्प मित्र, निसर्ग मित्र आणि जखमी प्राणी पक्षांचा रक्षणकर्ता देखील आहे. घरात शिरलेल्या सापाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडणे, त्याचबरोबर रस्त्यावरती जखमी अवस्थेत सापडलेल्या प्राणी पक्षांवरती प्राथमिक उपचार करुन त्यांना निसर्गात सोडणे ही कामे तो आपली जबाबदारी समजून अतिशय आवडीने आणि प्रामाणिकपणे करत असतो.
आज आषाढी एकादशी असल्याने त्यानिमित्त अक्षय मेस्त्री याने आषाढी एकादशी निमित्ताने तांदळाच्या एका दाण्यावरती विठ्ठलाची कलाकृती साकारली आहे. या कलाकृतीची उंची ३ मि.मि. आणि लांबी १ मि.मि. इतकी अतिशय छोट्या स्वरूपाची आहे. तांदुळावरती हे विठ्ठलाचे चित्र साकारायला त्याला दहा मिनिटांचा कालावधी लागला आहे. हे चित्र एक्रलिक कलरचा वापर करुन विठ्ठलाची कलाकृती साकारली आहे. तांदळाच्या दाण्यावरती हे सूक्ष्म विठ्ठलाचे रूप साकारले आहे. यापूर्वी त्याने अनेक प्राथमिक तसेच माध्यमिक विद्यालयात देखील राष्ट्रपुरूषांची हुबेहूब चित्रे साकारली आहेत. त्याचबरोबर सामाजिक संदेश देणारी चित्रे देखील रेखाटून भिंती बोलक्या करीत समाजात जनजागृती करण्याचेही काम तो करीत आहे.
अक्षय मेस्त्री यांने अनेक नामवंत कलाकार आणि व्यक्तींची देखील अतिशय सुबक पेंटिंग करून त्यांना भेट दिली आहेत. अतिशय शांत स्वभावाचा व शिस्तप्रिय तसेच सामाजिक कार्यात अगदी हिरिरीने सहभागी होणाऱ्या अक्षय मेस्त्री या गुणी कलाकाराचे सर्व स्तरातून यांच्या या कलेचे आणि छंदाचे कौतुक करण्यात येत आहेत.