खारेपाटण मध्ये शुक नदीला पूर ; पुराचे पाणी शहरात घुसले

खारेपाटण (प्रतिनिधी) : गेले काही दिवस सतंधार कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे खारेपाटण येथील शुक नदीने रौद्र रूप धारण केले असून शुक नदीला पूर आल्याने पुराचे पाणी खारेपाटण शहरात घुसले आहे.यामुळे खारेपाटण शहरातील काही रहदारीचे रस्ते पाण्याखाली गेले आहेत.

खारेपाटण येथे आज रविवारी पुन्हा एकदा पुराचे पाणी खारेपाटण शहरात घुसू लागल्याने स्थानिक नागरिक व व्यापारी वर्गाची एकच धावपळ उडाली.सायंकाळी ४.०० नंतर विजयदुर्ग खाडीला आलेल्या पुराच्या पाण्यामुळे शुक नदीने धोक्याची पातळी ओलांडली. तर खबरदारी म्हणून खारेपाटण मधील व्यापारी वर्गाने आपले दुकानातील साहित्य सुरक्षित स्थळी हलविण्यास सुरवात केली. दरम्यान खारेपाटण ग्रामपंचायतच्या वतीने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन सरपंच सौ प्राची ईसवलकर यांनी केले आहे.

खारेपाटण मध्ये आज आलेल्या पुराच्या पाण्यामुळे खारेपाटण मासळी मार्केटमध्ये पुराचे पाणी शिरले.तसेच बाजारपेठेतून श्री देव कालभैरव मदिरकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेला असून खारेपाटण बाजारपेठतून बंदरवाडीकडे जाणारा घोडेपाथर येथील रस्ता पाण्याखाली गेला असून येथील वाहतूक पूर्णतः हा थांबली आहे. तसेच खारेपाटण हून चिंचवली गावाकडे जाणारा रस्ता देखील पाण्याखाली गेला आहे. याबरोबरच खारेपाटण येथील भाटले, बीगे,भाटी या शेतमळ्यात देखील पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात साचून राहिले आहे.

दरम्यान पावसाचा असाच जोर राहिल्यास खारेपाटण बाजारपेठेत पुन्हा एकदा पुराचे पाणी शिरण्याची दाट शक्यता असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.या पुराच्या पाण्यामुळे खारेपाटण मधील काही घरामध्ये दुकान गळ्यामध्ये पुराचे पाणी गेले असून पुराच्या पाण्याचा फटका सातत्याने येथील नागरिकांना बसत आहे.प्रशासनाने याबाबत योग्य तो पर्याय काढून येथील नागरिकांचे पुरामुळे होणाऱ्या नुकसाना पासून वाचविले पाहिजे.

error: Content is protected !!