मसूरे (प्रतिनिधी) : पर्यटन, हापूस, आंबा, मत्स्य उद्योग प्रक्रिया हे कोकणच्या विकासाचे मुख्य विषय आहेत. या उद्योगांमध्ये कोकणात हजारो तरुण काम करत आहेत. ज्या पद्धतीने साखर उद्योग पश्चिम महाराष्ट्रात विकसित झाला असा सुनियोजित प्रयत्न कोकणात पर्यटन आणि मत्स्य उद्योग आणि फलोद्यांन मध्ये व्हायला हवे. पण गेली 75 वर्ष कोकण दुर्दैवाने दुर्लक्षित आहे आणि त्यामुळे कोकणाच्या या मूलभूत विषयांना आणि यातील उद्योजकांना कोणत्याही स्वरूपाची मदत मिळत नाही. त्यापुढे जाऊन कोकणातील अनेक पर्यावरण पूरक उद्योगांना सहजपणे परवानगी सुद्धा मिळत नाहीत. कोकण विकासाच्या विषयांवर रचनात्मक व्यासपीठ आहे. कोकणातील उद्योजकांचे प्रश्न समस्या त्यांना सरकारी योजना मिळाव्यात यासाठी एक व्यावसायिक संघटन हवे म्हणून कोकण चेंबर ऑफ कॉमर्स ची स्थापना करण्यात आली आहे असे प्रतिपादन ग्लोबल कोकण चे अध्यक्ष संजय यादवराव यांनी दादर मुंबई येथे केले. या चेंबरच्या स्थापनेच्या पहिल्याच शिवाजी मंदिर दादर येथील कार्यक्रमात एक हजार हून अधिक कोकणातील उद्योजक संपूर्ण कोकणातून आणि मुंबई पुण्यातून सहभागी झाले होते.
कोकणातील बंद घरे, रिकामी होणारी गावे, रिकामी होणाऱ्या शाळा, वेगाने होणारी जमिनीची विक्री हे सर्व थांबवायचे असेल तर कोकणात गावागावात उद्योग उभे राहिले पाहिजेत आणि यासाठी मुंबई पुण्यातील सक्षम कोकणी उद्योजकांनी आणि कोकणात प्रत्यक्ष काम करणार आहोत त्यांनी यासाठी एकत्र यायला हवे. एकमेकांना मदत करायला हवी शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या व्यवस्था उभ्या राहिल्या, कोकणातील मूळ विषयांसाठी पायाभूत सुविधा उभ्या राहिल्या पाहिजेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या उद्योगांना सहजपणे परवानग्या आणि बँकांकडून योग्य दराने कर्ज पुरवठा झाला पाहिजे. दुर्दैवाने हे कोकणात होत नाही शासकीय यंत्रणांकडून अडवणूक होते. ही परिस्थिती कोकणवासीयांसोबत घेऊन बदलावी हा निर्धार करून संजय यादवराव चालवत असलेल्या समृद्ध कोकण चळवळीच्या माध्यमातून कोकण चेंबर ऑफ कॉमर्स हे रचनात्मक आणि समृद्ध महाराष्ट्र संघटना हे संघर्षात्मक व्यासपीठ निर्माण करण्यात आले आहे असे यावेळी सांगण्यात आले. कोकण विकासासाठी गेली 25 वर्ष सातत्याने काम करणारे कोकणातील पर्यटन, शेती उद्योग, मत्स्य उद्योग, ग्रामीण उद्योग सर्व उद्योजकांना संघटित करणारे ग्लोबल कोकण सारखा आंतरराष्ट्रीय महोत्सव दरवर्षी आयोजित करणारे संजय यादवराव यांच्या कोकणातील सामाजिक चळवळीला पंचवीस वर्षे पूर्ण झाली यानिमित्ताने कार्यकर्त्यांच्या वतीने संजय यादवराव यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
या चळवळीत सुरुवातीपासून सहभागी असणारे आमदार भाई जगताप आणि आमदार प्रसाद लाड हे यावेळी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते व अनेक मान्यवर उद्योजकांच्या उपस्थितीमध्ये यावेळी यादवराव यांचा सन्मान करण्यात आला. पहिल्या दिवशी कोकण चेंबर ऑफ कॉमर्स चे सदस्य 100 उद्योजक झाले हा सुद्धा एक ऐतिहासिक रेकॉर्ड आहे. ही परिषद सात तास बिना ब्रेक सलग चालली. प्रचंड उत्साहामध्ये सर्व कोकणवासी उद्योजक यात सहभागी झाले होते,. या चळवळीचे मार्गदर्शक आमदार भाई जगताप आणि आमदार प्रसाद लाड दोघांनीही यावेळी सांगितले की कोकणच्या विषयांमध्ये संघर्ष करण्याकरता किंवा रचनात्मक कामासाठी सर्व पक्षांचे आमदार आम्ही एकत्र येऊन या चळवळीच्या मागे उभे राहू. पण रडल्याशिवाय आई सुद्धा दूध देत नाही त्यामुळे कोकणचे प्रश्न केवळ आमदारांनी न मांडता रस्त्यावर जनतेने सुद्धा मांडले पाहिजे आणि त्याकरता या चळवळीने पुढील काळात पुढाकार घ्यावा. असे मत मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले.
आज पर्यंत समृद्ध कोकण चळवळ येथून कोकणात हजारो प्रकल्प गावागावात उभे राहिले. यातील मोठ्या यशोगाथा कोकण विकासाचे उद्योजकतेचे मोठे विषय यांचे सादरीकरण प्रत्यक्ष फिल्म आणि हे प्रकल्प ज्यांनी उभारले त्यांचे मनोगत यावेळी
व्यक्त करण्यात आले. कोकणात पर्यटनाची क्रांती करणारे डॉक्टर चंद्रकांत मोकल, युरोप सारखा गाव उभारणारे अविनाश पाटील कोकणातील पहिली वायनरी सुरू करणारे श्रीकांत सावे, कोट्यावधीचा भाजीपाला उद्योग उभारणारे रामू सावे, कोकणातील सर्वात मोठे रिसॉर्ट उभारणारे संदीप घरत, आणि सागर सावलीचे मंगेश मोरे सागर मोरे बांबू लागवडीचा मोठा प्रकल्प मायकल डिसोजा अशा अनेक मान्यवर उद्योजकांची माहिती आणि फिल्म यावेळी दाखवण्यात आल्या.
पुढील महिन्यात कोकणातील मच्छीमारांचे आणि आंबा बागायतदारांचे मोठे आंदोलन आपण आपल्या चळवळीतून उभारणार आहोत याची घोषणा संजय यादव राव यांनी यावेळी केली. यावेळी कोकणातील वेगवेगळ्या मच्छीमार संस्थांचे पदाधिकारी या परिषदेला आवर्जून उपस्थित होते. सर्व कोकणवासीयांनी या संघर्षाच्या कार्यक्रमाला सुद्धा संपूर्ण पाठबळ देण्याचे यावेळी जाहीर केले. यावेळी समृद्ध मराठी नावाचे यूट्यूब चैनल चळवळीच्या माध्यमातून सुरू करण्यात आले. चेंबरचे वेबसाईटचे उद्घाटन सुद्धा याच कार्यक्रमात झाले. यावेळी अरे नंद हा दुधाचा ब्रँड घोषणा करण्यात आली. कोकण विकासाचे अनेक नवनवीन स्टार्टअप पुढच्या काळात चेंबरच्या माध्यमातून सुरू होणार आहेत. या चळवळीतील प्रमुख पदाधिकारी किशोर धारिया, अजित मराठे, राजस्थानचे माजी कुलगुरू अरुण सावंत, महा चेंबर ऑफ कोमर्स कोकण सेल उपाध्यक्ष उद्योजक डॉ दीपक परब, डॉ. विकास शेट्ये, पितांबरीचे माधव पुजारी, ओम प्रकाश कोळथरकर सुनील आकरेकर प्रशांत सावंत, युयुत्सू. आरते, नरेंद्र बामणे राम कोळवणकर, डॉक्टर दीपक दळवी, काशिनाथ तारी, डॉ. राजीव भाटकर, प्रशांत सावंत, हरीश बारी, किरण परब, मंदार जोशी, अजय पाताडे, राजेंद्र बांदल, संदीप शिरधनकर, अनिश निमकर आणि अनेक मान्यवर यावेळी सहभागी होते. मान्यवरांचे सत्कार करण्यात आले.
















