तीन लाख रुपयांचे पारितोषिक देऊन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते गौरव
कणकवली (प्रतिनिधी) : महिलांच्या हाताला काम देत त्यांना स्वावलंबी बनवणाऱ्या आणि मसाला निर्मितीच्या क्षेत्रात आपलं एक वेगळं अस्तित्व निर्माण करणाऱ्या कणकवली तालुक्यातील कलमठ येथील उद्योजिका तन्वीर मुदस्सरनझर शिरगावकर यांच्या न्यू खुशबू स्वयंसहायता महिला समूहाच्या महितीपटाला महाराष्ट्र राज्य चित्रपट आणि लघुपट स्पर्धेमध्ये तीन लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक प्राप्त झाले आहे. नवी मुंबई येथे झालेल्या पारितोषिक वितरण सोहळ्यात महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते हे पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी तन्वीर शिरगावकर यांनी समूहाच्या वतीने या परितोषिकाचा स्वीकार केला.
उच्च शिक्षित असलेल्या तन्वीर शिरगावकर यांनी २०१४-१५ साली घरगुती मसाला उद्योग सुरू केला. त्यानंतर २०१६-१७ साली कलमठ भागातील महिलांना एकत्र करत केवळ १५ हजारांच्या गुंतवणुकीतून न्यू खुशबू महिला स्वयंसहायता समूह स्थापन केला आणि आज या समूहाच्या माध्यमातून त्या लाखोंचा व्यवसाय करत आहेत. न्यू खुशबू महिला समूहाच्या माध्यमातून आज कित्येक महिलांना कायमचा रोजगार प्राप्त झाला आहे. महिलांना स्वावलंबी करण्यासोबतच मालवणी मसाल्याची चव सर्वदूर पोहोचविणाऱ्या न्यू खुशबू महिला समूहाच्या महितीपटाला जागतिक महिला दिनाच्या औचित्यावर राज्य चित्रपट आणि लघुपट स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त होणे ही जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट आहे. या पारितोषिकामुळे न्यू खुशबू महिला समूहाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.