स्थानिक बेरोजगार संघर्ष समितीचे धरणे आंदोलन
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : स्थानिक बेरोजगार उमेदवाराबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डीएड, टीईटी, सीटीईटी, टीएआयटी पात्रताधारक उमेदवारांना सरसकट शिक्षण सेवक पदी नियुक्ती देण्यात यावी. या मागणीसाठी आज स्थानिक भरती बेरोजगार संघर्ष समिती सिंधुदुर्गच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक भरतीत जिल्ह्यातील स्थानिक डीएड बेरोजगार उमेदवारांना सरसकट शिक्षण सेवक म्हणून सामावून घ्यावे. या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनातील आंदोलकांना मंत्रालय स्तरावर शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी तोडगा काढून कंत्राटी पदावर सामावून घेण्याचे आस्वासन दिले आहे. त्यांना सेवेतून कमी केले जाणार नाही अशी ग्वाही दिली. तसेच हा निर्णय संपूर्ण महाराष्ट्रासाठी लागू राहणार आहे. तसेच २१५ जणांची यादी शासनाकडे दिल्याचे माहिती आहे. मात्र यादीमध्ये डीएड, टीईटी, सीटीईटी, टीएआयटी पात्रताधारकांची नावे नसल्याचा आरोप स्थानिक भरती बेरोजगार संघर्ष समिती अध्यक्ष विनय गायकवाड यांनी केला आहे.
शिक्षक सेवक पदांवर डीएड, टीईटी, सीटीईटी, टीएआयटी पात्रताधारकांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे. रिक्त पदांवर कंत्राटी पद्धतीने उमेदवार न भरता पहिल्या टप्यामध्ये जे उमेदवार डीएड, टीईटी, सीटीईटी, टीएआयटी पात्रताधारक आहेत अशा उमेदवारांना रिक्त पदांवर सरळसेवेत सामावून घेण्यात यावे. दुसऱ्या टप्यामध्ये जे उमेदवार डीएड, टीईटी २, सीटीईटी २, टीएआयटी पात्रताधारक आहेत अशा उमेदवारांना रिक्त पदांवर सरळसेवेत सामावून घेण्यात यावे. तिसऱ्या टप्प्यामध्ये पदवीधर रिक्त पदांसाठी पदवी व डीएड/बीएड, टीईटी २, सीटीईटी २, टीएआयटी धारक उमेद्वारांना सरळसेवेत सामावून घेण्यात यावे. चौथ्या टप्यामध्ये जे उमेदवार डीएड पास आणि टीईटी, सीटीईटी, टीएआयटी अपात्र आहेत अशा उमेदवारांना रिक्त पदांवर सरळसेवेत सामावून घ्यावे तसेच त्यांनी भविष्यात आवश्यक निकषांची पात्रता पूर्ण केल्यावर त्यांना नियमित सेवेत घेणेत यावे. ही प्रक्रिया कंत्राटी पद्धतीने राबविण्यात येऊ नये. आदी मागण्यांसाठी स्थानिक भरती बेरोजगार संघर्ष समिती सिंधुदुर्गच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
आंदोलकांनी केला रस्ता बंद; नागरिकांची तीव्र नाराजी
स्थानिक भरती बेरोजगार संघर्ष समिती सिंधुदुर्गच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. मात्र हे आंदोलन करताना या आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या मार्गावर मंडप घालून हा रस्ता पूर्णतः बंद केला होता. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय, माजी सैनिक विभाग , कोषागार कार्यालय ,एसबीआय बँकेत येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय झाली, लांबून जावे लागले. आंदोलकांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन जरूर करावे, पण रहदारीचा रस्ता बंद करू नये अशा शब्दात नागरिकांनी आपली नाराजी व्यक्त केली.