महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे साखळी उपोषण आंदोलन

12 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट दरम्यान छेडणार साखळी उपोषण आंदोलन

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : भारतीय मजदूर संघ संलग्न महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ यांच्यावतीने साखळी उपोषण आंदोलन सोमवार दिनांक 12 ऑगस्ट ते शनिवार दिनांक 17 ऑगस्ट दरम्यान आंदोलन करणार आहेत. आंदोलनाच्या प्रमुख मागण्या ह्या तिन्ही कंपन्यातील वीज कंत्राटी कामगारांना एन एम आर किंवा हरियाणा पॅटर्ननुसार कंत्राटदार विरहित रोजगार व जॉब सिक्युरिटी द्यावी तसेच तिन्ही कंपन्यातील वीज कंत्राटी कामगारांना स्वतंत्र किमान वेतन श्रेणी व वेतन वाढ देण्यात यावी तसेच संघटनेने यापूर्वी केलेल्या पत्रव्यवहार व तक्रारींबाबत त्वरित कारवाई करून कामगारांना न्याय द्यावा या मागण्यांसाठी साखळी उपोषण आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यातील महावितरण महापारेषण व महानिर्मिती कंपनीत वर्षानुवर्षे नियमित विविध मंजूर रिक्त पदांच्या जागेवर कार्यरत असलेल्या सुमारे ४२,००० वीज कंत्राटी कामगारांना पूर्वाश्रमीच्या महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ असतानाच्या ज्या शासन मान्यता प्राप्त रोजंदारी कामगार पद्धतीद्वारे त्या काळात कंत्राटदार विरहित रोजगार दिला जात होता, त्याच पद्धतीने तिन्ही वीज कंपनीत वर्षानुवर्षे नियमित विविध मंजूर रिक्त पदांच्या जागेवर कार्यरत असलेल्या वीज कंत्राटी कामगारांना रोजगार देण्यात येऊन त्यांना सेवेत सामावून घ्यावे. संघटनेच्या या मागणी नुसार २०१५ साली रानडे समितीची स्थापना तत्कालीन माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली होती. त्या अहवालाची अंमलबजावणी करावी, अथवा हरियाणा राज्यात ज्या पद्धतीने सर्व कंत्राटी कामगारांनां कंत्राटदार विरहित शाश्वत रोजगार दिला त्याच प्रमाणे महाराष्ट्रातील वीज कंत्राटी कामगारांना कंत्राटदार विरहित शाश्वत रोजगार मिळावा. तसेच तिन्ही वीज कंपनीतील वीज कंत्राटी कामगारांना स्वतंत्र वेतन श्रेणी तातडीने लागू करून संघटनेने १८ सप्टेंबर २०२३ रोजी दिलेल्या एप्रिल २०२३ ते मार्च २०२८ साठीचे वेतनवाढ मागणी पत्रानुसार वेतनवाढ लागू करून दि. १३ मार्च २०१९ च्या इतिवृत्तांता नुसार तिन्ही वीज कंपनीतील कंत्राटी कामगारांना एक समान वेतन द्यावे आणि संघटनेने या पूर्वी केलेल्या विविध पत्र व्यवहार व तक्रारी या बाबत त्वरीत कारवाई करुन कामगारांना न्याय देण्यात यावा.

error: Content is protected !!