आचरा गावामधील शासन दप्तरी नोंद असलेली ३८५ एकर जमिन गहाळ

सखोल अशी चौकशी करून हया शासकीय जमिनी पूर्ववत ताब्यात घ्याव्या

सरपंच मंगेश टेमकर यांचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना निवेदन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील आचरा गावामधील शासन दप्तरी नोंद असलेली ३८५ एकर जमिन गहाळ झाल्याची आचरा माजी सरपंच मंगेश टेमकर यांनी लेखी निवेदनाद्वारे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे. मंगळवारी सिंधुदुर्गनगरी येथे संपन्न झालेल्या कुडाळ – मालवण जनता दरबारात ही तक्रार केली आहे.

दिलेल्या निवेदनात मंगेश टेमकर यांनी, मी आचरा गावचा सरपंच म्हणून काम केले आहे. गावातील सर्व ग्रामस्थांच्या अडीअडचणींमध्ये माझा सक्रिय सहभाग असतो. आचरे गावातील सर्व कारभार पाहता शासकिय नोंदवहीप्रमाणे गावांत ३८५ एकर शासकिय जमिनीची नोंद आहे. हा जमिनीचा प्रकार खाडीपात्र, समुद्र किनारी, स्मशानभूमी, पुळणपड, दफनभूमी, पांदण रस्ते, वाहळ या स्वरूपाचा आहे. गावचे एकुण रेकॉर्ड (आकारफोड) पाहता यामध्ये अशा शासकिय नोंदीवहीत नोंदी दिसून येतात. असे असताना तत्कालीन ग्रामसेवकांनी या जमिनी परस्पर ग्रामसेवक (तलाठी) यांनी खाजगी संस्थेच्या नावावर केल्याचे ७/१२ पाहता रेकॉर्डमध्ये दिसून येते. या जमिनी शासकिय आहेत हे ओळखण्यासाठी जुने अथवा नविन ७/१२ काढल्यास बीनआकारी जमिनी आहेत. अशा जमिनींवर आपल्या अधिकरात तहसिलदारांनी नोंदी घातल्या आहेत. हे पूणपर्ण बेकायदेशीर आहे. त्यामुळे आपण आपल्या स्तरावर याकामी पूर्ण सखोल अशी चौकशी करून हया शासकीय जमिनी पूर्ववत ताब्यात घ्याव्या.

आपण सरपंच असताना त्याकाळात असणाऱ्या सर्व महसुल खात्याकडे व संबंधित सर्व मंत्री यांच्याकडे याची वारंवार तक्रार दिलेली होती. त्यामध्ये महसुल खात्याचे व खाजगी संस्थेचे एकमेकांशी संगणमत केलेले दिसून येते. यामध्ये पूर्वापार चाललेल्या म्हणीनुसार ‘तु मारल्यासारखे कर मी रडल्यासारखे करतो’ ही भूमिका या दोघांची आहे. त्यामुळे संबंधित महसुल विभाग अधिकारी व खाजगी संस्थांचे लागेबंधे असल्याचे उघड होतात. यामधील संबंधित भष्टाचारी अधिकारी व संबंधित संस्थेवर कारवाई व्हावी व मुळ दस्तऐवजाप्रमाणे शासकीय जमिनी हया शासनाने त्वरीत ताब्यात घ्याव्यात. या बाबतीत आपण योग्य तो निर्णय न घेतल्यास मी स्वतः शासनाच्या विरोधात हायकोर्टमध्ये जनहित याचिका दाखल करणार आहे. त्यामुळे वरिल तक्रारीचा योग्य तो निर्णय घेऊन आपण त्वरित संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करून, योग्य तो न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!